Maharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:05 PM2019-10-18T12:05:01+5:302019-10-18T12:08:12+5:30
शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.
देवगड : मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांसह गोरगरिबांची मला जाण आहे. मीही गरिबी अनुभवली आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मला माहीत आहे. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले.
देवगड तालुक्यातील फणसगांव येथे प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.
मी ३५ वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. मी उपभोगलेल्या पदांना नेहमी न्याय दिला आहे. शेतकºयांसह गोरगरिबांसाठी या पदांचा उपयोग केला. पदे घेऊन माझे उत्पन्न वाढविले नाही. जनतेच्या हितासाठी कामे केली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यापासून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत.
या केलेल्या कामाची जनतेकडे पोचपावती मागत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनीही आमच्यावर विनाकारण टीका न करता आपण केलेल्या कामाची पोचपावती मागावी. जनता त्याचे उत्तर देईल. असे सावंत यांनी पोंभुर्ले येथे बोलताना सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर, पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर, माजी सरपंच गणपत धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक पाडावे, गोविंद घाडी उपस्थित होते.
विद्यमान आमदार जनतेची कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे विचारण्याची गरज आहे. केवळ राडेबाजी व दहशत माजवून साºयांना त्रास दिला.
अधिकाऱ्यांवरील चिखलफेक प्रकरणामुळे राज्यात जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे. ही संस्कृती साऱ्यासाठी घातक आहे, असे त्यांनी कोर्ले येथे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर, विठ्ठलवाडी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच जयेश नर आदी उपस्थित होते.
नीतेश राणेंनी नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी
नाणारमुळे शेतकऱ्यांसह मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. कोकणाला हानिकारक ठरणारा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हांला नको आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. आमची विरोधाची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे.
आम्ही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपूर्वी विरोधाची भाषा करणाऱ्या नीतेश राणे यांनी आपली याबाबतची भूमिका आता जाहीर करावी, असे सतीश सावंत यांनी धालवली येथे सांगितले.