परिसर स्वच्छतेसाठी छायाचित्र पाठवा !
By admin | Published: October 18, 2015 10:30 PM2015-10-18T22:30:19+5:302015-10-18T23:30:35+5:30
पोलिसांचा अभिनव उपक्रम : श्रमदानात अधीक्षकांचा सहभाग
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलाने श्रमदानातून स्वच्छता अभियान हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दर गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान राबविणार आहेत. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणचे फोटो पाठविल्यास त्या-त्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
पोलीस आस्थापनेवरील विविध कार्यालये, वसाहती व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहिल्यास काम करण्याचा उत्साह व कार्यक्षमता वाढीस लागते. तसेच दररोज नव्याने भर पडणाऱ्या आव्हांनाचा सामना करण्यासाठी पोलिसांनी सज्ज असावे या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक शिंदे यांनी हे अभियान सुरू केले आहे.
याचाच एक भाग म्हणून श्रमदानातून स्वच्छता अभियानांतर्गत सुरुवातीला पोलीस कार्यालयाचा परिसर, पोलीस वसाहतींचा परिसर, जिल्हा पोलीस मुख्यालय व ज्या ठिकाणी पोलीस ठाणे आहे त्या शहरातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात येईल. हे अस्वच्छ ठिकाण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित असेल तर संबंधित ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेला सहकार्य व सहभागाबाबत विनंती केली जाईल व पोलीस आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त अभियानातून परिसर स्वच्छ केला जाईल.
या अभियानातून श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, अस्वच्छतेपासून स्वच्छतेकडे संपूर्ण परिसराचे रूपांतर व्हावे, पोलीस व जनता यांच्यात आपुलकीचे संबंध निर्माण व्हावेत, अशी विविध उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत. या अभियानाचे समन्वय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. सहस्त्रबुद्धे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमात भरभरून प्रतिसाद देऊन संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्यास जनतेने हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले . (प्रतिनिधी)
३३ अधिकारी सहभागी : एकाच वेळी सर्वत्र
दर गुरुवारी सकाळी ७ ते ९ या कालावधीसाठी असला तरी जिल्ह्यातील किमान १४ ठिकाणी एकाचवेळी हा उपक्रम राबविला जाईल. याची सुरुवात शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर स्वच्छ करून झाली. यात पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, वाहतूक शाखा, श्वानपथक, जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणी व दोन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये यांची स्वच्छता ३३ अधिकारी व १७६ कर्मचारी यांनी केली.