प्रसाद लोके खून प्रकरण तपास सीआयडीकडे द्या, संदेश पारकर यांनी केली मागणी
By सुधीर राणे | Published: September 27, 2023 01:23 PM2023-09-27T13:23:13+5:302023-09-27T13:23:54+5:30
कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा ...
कणकवली: मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके यांची आत्महत्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात पोलिस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे. हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणेवर भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विश्वास राहिलेला नाही, हेच सिद्ध होते.
आरोपीने वैद्यकीय कारणांची ढाल समोर केली आहे. स्थानिक पोलिस यासंदर्भात ठोस माहिती देण्यास कुचराई करीत आहेत. जर आरोपीची प्रकृती ठीक नसेल तर तो एवढी मोठी हत्या एकटा कसा काय करू शकतो? याप्रकरणी अन्य काही आरोपी असल्याचा पोलिसांनाही संशय आहे, मग त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोलिस का पोहोचू शकत नाहीत? स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम नसल्याचा स्थानिक जनतेचा आरोप आहे.
स्थानिकांच्या सोबत राहणे हा शिवसेनेचा धर्म आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे. तसेच आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावेत. तपासात दिरंगाई अथवा ढिलाई आढळून आल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.