वेतन अहवाल बीडीओंकडे पाठवा
By admin | Published: June 9, 2016 11:57 PM2016-06-09T23:57:17+5:302016-06-10T00:15:56+5:30
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी : ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना दिले जाणारे किमान वेतन व राहणीमान भत्त्याचा अहवाल ग्रामसेवकांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीसह गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संंघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अधिनियम कायद्यानुसार अनेक ग्रामपंचायतींत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनात मोठी तफावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे.
त्याचा निपटारा होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय पातळीवर समजणे गरजेचे आहे; पण तसे न होता कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे. शिवाय तालुका स्तरावरून गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट फंड, सेवा पुस्तके याबाबत वर्षातून तीन वेळा बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याची गरज आहे; पण याबाबतही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, आदी समस्यांबाबत कर्मचाऱ्यांनी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली.
यावेळी प्रशासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कटिबद्ध असून, याची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह यांनी दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर, उपाध्यक्ष प्रदीप परब, सचिव अभय सावंत, अशोक जाधव, सचिन मगर, सूर्यकांत नेवरेकर, उदय कदम, कृष्णा गावडे, रणजित दत्तदास, नामदेव फोंडके यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)