वरिष्ठ नेत्यांमुळे भाजपचा पराभव? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाची कणकवलीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 06:24 PM2018-04-15T18:24:26+5:302018-04-15T18:24:26+5:30
चिंतन बैठकीत कणकवलीतील पराभवावर चर्चा
कणकवली : वरिष्ठ नेते कमी पडल्यानं कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याचं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्य केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत चव्हाण यांनी 'वरिष्ठ नेत्यांना पराभव पत्करावा लागला', असं म्हटल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा नारा दिला.
वरिष्ठ स्तरावरून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. पराभवानं खचून न जाता पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं समजतं. भाजपचे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे भाजपमध्ये एकी नसल्याचे दिसून आले. या बैठकीत पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यात आलं. चार प्रभागांमध्ये शिवसेनेशी झालेली मैत्रीपूर्ण लढत अंगलट आल्यामुळे पुढील निवडणुकीत कुबड्या नकोच असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेच्या कुरबुरी सांगू नका, तर आलेले अनुभव उराशी बाळगून मार्गक्रमण करा, यश नक्कीच मिळेल असा विश्वास चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपने अनेक पराभव पचवले आहेत. पण भाजप कधीच डळमळला नाही. त्याच ताठ मानेने भाजपने केंद्रात व राज्यातही मुसंडी मारली. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं न डगमगता पुढील निवडणुकीला धैर्याने सामोरे जा, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. संदेश पारकर यांचा फक्त ३७ मतांनी पराभव झाला. पारकर यांना ऐन निवडणुकीत रिंगणात उतरवलं. तरीही त्यांनी चांगली कामगिरी केली. संदेश पारकर यांनी जिद्दीनं रणांगणात उतरून शत्रूच्या तोंडाला फेस आणला, असं म्हणत चव्हाण यांनी पारकर यांचं कौतुक केलं.