ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:43 AM2021-07-11T11:43:03+5:302021-07-11T11:43:10+5:30
सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर यांचा साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणून नावलौकिक होता.
सिंधुदुर्ग : ज्येष्ठ गझलकार आणि अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.
सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर यांचा साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणून नावलौकिक होता. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. त्यांनी लिहिलेली ‘ठेव तू मनातल्या मनात’ ही कविता सुरेश भट यांनी वाचली. ही कविता वाचून त्यांनी नानिवडेकर यांची पाठ थोपटली होती. भटांच्या या शाबासकीनंतर ते गझल या काव्यप्रकाराकडे वळले. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या गझला अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केल्या आहेत.
गझल क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे नानिवेडकर हे व्यवसायाने पत्रकार होते. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी येथे झालेल्या ९ व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सिंधुदुर्गातील दिवंगत साहित्यिकांचा परिचय करून देणाऱ्या 'साहित्य सिंधू' या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते. 'चांदणे नदीपात्रात' हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. नानिवडेकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.