ज्येष्ठ नेते गोपाळ दुखंडे यांचे निधन
By admin | Published: June 13, 2017 11:34 PM2017-06-13T23:34:35+5:302017-06-13T23:34:35+5:30
ज्येष्ठ नेते गोपाळ दुखंडे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (वय ७४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई गोरेगाव येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर आज, बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
प्रा. दुखंडे हे मूळचे मालवण-त्रिंबक येथील होते. त्यांचा जन्म १ जून १९४३ रोजी झाला. वडील गिरणी कामगार असल्याने त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथेच झाले. गोरेगाव सिद्धार्थनगर येथील चाळीत शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजवादी चळवळीवर लक्ष केंद्रित केले. त्यातूनच ते छात्रभारतीशी जोडले गेले. त्यामुळे अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या आंदोलनाची पहिली सुरुवात ही गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यातून झाली होती.ते सतत आंदोलनात सक्रिय असायचे. अन्यायाविरोधात ते आयुष्यभर लढत राहिले.गोरेगाव येथे असताना त्यांची समाजवादी विचारसरणीशी नाळ जोडली गेल्याने त्यांचा संबंध ज्येष्ठ नेते ना.ग.गोरे, प्रा. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, ग. प्र. प्रधान, मृणालताई गोरे, निहाल अहमद आदी समाजवादी नेत्यांशी आला आणि त्यातूनच त्यांचे प्रखर असे नेतृत्व उभे राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक आंदोलनाची धार वाढविली. सत्ताधारीपक्षावर सडकून टीका करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलनेही केली आणि त्यांना न्यायही मिळवून दिला. भिवंडी येथे बीएनएन महाविद्यालयात प्राध्यापक असतानाही ते आंदोलनातून कधीही मागे हटले नाहीत.
मुंबई विद्यापीठ सिनेटचे सदस्य असताना सिनेटचा कारभार हा मराठीतून झाला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी सतत आंदोलन केले. सिनेटमधील प्रत्येक भाषणावेळी ते गळ्यात पाटी घालून भाषण करीत असत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार कालांतराने मराठीतून झाला. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र हे रत्नागिरीत असावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठीही त्यांनी आंदोलन केले. त्यालाही त्यांना चांगले यश आले होते.
प्रा. दुखंडे हे मालवण-त्रिंबक येथील असले तरी त्यांचे पूर्ण आयुष्य हे मुंबई-गोरेगाव येथे गेले होते. त्यांनी १९९५मध्ये तत्कालीन मालवण मतदारसंघातून नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी राणेंविरोधात निवडणूक लढविण्यास कोण तयार नव्हता, पण जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक लढवली. मात्र, ते पराभूत झाले. त्यानंतर कोकण पदवीधर तसेच १९९१ मध्ये मुंबई-दादर लोकसभा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यातही त्यांच्या पदरी निराशाच आली होती. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन उपपंतप्रधान देवीलाल आले होते.
दरम्यान, प्रा. दुखंडे यांच्यावर अलीकडेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग फारसा नव्हता. तरीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरूच होते. सोमवारी (दि. १२) रात्रीही त्यांनी ११ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
घरी नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी
प्रा. गोपाळ दुखंडे यांची सावंतवाडीशी खऱ्या अर्थाने नाळ जोडली ती २००८ मध्ये. सावंतवाडी-सूर्योदयनगर येथे त्यांनी एक घर विकत घेत आपले उर्वरित आयुष्य कोकणच्या विकासासाठी घालवायचे असा निश्चय केला होता. त्यातूनच त्यांनी सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात मायनिंग विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले.
च्त्यांच्या आंदोलनाची दखल तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारलाही घ्यावी लागली होती. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातही त्यांनी तेथील ग्रामस्थांसोबत जोरदार आंदोलन केले. त्यामुळे ते नेहमीच येथील सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांशी जोडले गेले होते. त्यांचे घर नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजून जात असे.
देहदानाची इच्छा बोलून दाखविली
प्रा. गोपाळ दुखंडे यांची देहदान करण्याची इच्छा होती. त्यांनी तशी इच्छा बोलूनही दाखविली होती. अलीकडेच त्यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून देहदानाचा फॉर्म घेऊन या, असे सांगितले होते. त्यांनी तो फॉर्म आणला होता, तर सोमवारी रात्रीही कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते देहदानाबाबत सतत बोलत होते.