जेष्ठ कवी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 11:14 AM2021-07-12T11:14:15+5:302021-07-12T11:17:28+5:30
culture Sindhudurg : जेष्ठ कवी आणि ख्यातनाम गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी (ता.११) पहाटे तळेरे येथे हद्यविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. ह्यचांदणे नदीपात्रातह्ण या त्यांच्या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
वैभववाडी : जेष्ठ कवी आणि ख्यातनाम गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी (ता.११) पहाटे तळेरे येथे हद्यविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. ह्यचांदणे नदीपात्रातह्ण या त्यांच्या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील नानिवडेचे सुपुत्र असलेले मधुसूदन नानिवडेवर हे सध्या तळेरे येथे वास्तव्यास होते. पहाटे त्यांना राहत्या घरी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव नानिवडे येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अत्यंविधी करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते.
नानिवडेकर गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी शेकडो कविता लिहील्या. त्यांच्या कित्येक गझला लोकप्रिय आहेत. २००४ मध्ये त्यांचा चांदणे नदीपात्रात हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला सन्मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. त्याचबरोबर गझलकार म्हणूनही त्यांनी एक वेगळी प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली होती.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक गझला गायिल्या आहेत. त्यांची निघायला हरकत नाही ही गझल खुपच गाजली. गझल प्रांतात त्यांना प्रसिध्द गझलकर सुरेश भट यांचे वारसदार म्हणून ओळखले जात असे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत त्यांचे भरीव योगदान आहे. परिषदेच्या तालुकानिहाय शाखा निर्माण करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात गझलांचे शेकडो कार्यक्रम केले. गेली तीस वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत होते. पुढारीमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले.
याशिवाय राज्यातील विविध दैनिकांत स्तंभ लेखन, तसेच आघाडीच्या मासिकांतून लेखन केले. सध्या ते महाराष्ट्र टाईम्समध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. नानिवडेचे सरपंच म्हणूनही पाच वर्षे त्यांनी कारभार पाहिला होता. त्यांच्या निधनाची माहिती राज्यभर पसरताच साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
दिलखुलास व्यक्तिमत्व!
वैभववाडीतील ख्यातनाम कवी चेतन बोडेकर यांच्या गाव या मालवणी काव्यसंग्रहासाठी नानिवडेकर यांनी प्रस्तावना द्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु मालवणी कविता संग्रहाला प्रस्तावना देण्याचा अधिकार हा वस्त्रहरणकार लेखक गंगाराम गवाणकर अर्थात नानांचा आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्याशी संपर्कही साधला. गावसाठी त्यांच्याकडून प्रस्तावना लिहून घेत प्रकाशनही त्यांच्याच हस्ते होण्यासाठी पुढाकार घेतला.