'सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युतीचा निर्णय वरिष्ठच घेतील!'; सभासद नोंदणीला सुरुवात
By सुधीर राणे | Published: September 5, 2022 04:39 PM2022-09-05T16:39:48+5:302022-09-05T16:40:28+5:30
आमदार वैभव नाईक आपल्या सोबत यावेत यासाठी प्रयत्न करणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणीला आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत. आगामी निवडणुकांमध्ये भाजप बरोबरच्या युतीबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठच घेतील. मी ज्या पक्षात आहे, तो पक्ष वाढविण्याची माझी प्रथम जबाबदारी आहे. ते काम मी प्रामाणिकपणे करणार असल्याचे सूचक वक्तव्य माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेचे अनेक प्रश्न अद्यापही 'जैसे थे'च आहेत. जिल्ह्याचा विकास पर्यटनातून होऊ शकतो. यासाठी या ठिकाणच्या पर्यटन विकासाला अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कणकवली येथिल मराठा मंडळ रोडवरील शिवसेनेच्या नूतन मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी कृषी सभापती संदेश सावंत-पटेल, सुनील पारकर, भास्कर राणे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, दामोदर सावंत यांच्यासह शिंदे गटातील शिवसैनिक उपस्थित होते.
सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर या जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. मात्र, तो कुठे गेला हे अद्यापही समजलेले नाही. आम्ही तारकर्ली येथे तंबू निवास चालवले. जिल्ह्याच्या किनारी भागात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या विविध योजना राबवल्या. न्याहारी निवास योजना राबवत असताना जिल्ह्याचा पर्यटनात्मक विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न आपण केले आहेत. आगामी काळात पर्यटनातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
जिल्ह्यातील तरुण मुले क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ऑलम्पिक पर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अद्ययावत व्यायामशाळा उभारल्या जाणार आहेत. या सोबतच येथील शेतीचा शाश्वत विकास झाला पाहिजे. हे आमचे धोरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणाला अनुसरून येथील उत्पादित शेती मालाला अन्य भागात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक आपल्या सोबत यावेत यासाठी प्रयत्न करणार
यापुर्वी माझ्या सोबत ज्या सहकाऱ्यांनी काम केले आहे त्या सर्वाना पक्ष संघटना बांधणी करताना सोबत घेणार आहे. आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, संदेश पारकर हे देखील आपल्या सोबत यावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर सावंत यावेळी म्हणाले.