भाजी विक्रेत्याच्या मृत्यूनंतर खळबळ, पत्नी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:49 PM2020-09-21T13:49:51+5:302020-09-21T13:51:45+5:30
कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एका भाजी विक्रेत्याच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तो जरी कोरोनाबाधित नसला तरी त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेते व सलून व्यावसायिक यांची चाचणी करण्यास दिलेल्या आदेशानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एका भाजी विक्रेत्याच्या मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तो जरी कोरोनाबाधित नसला तरी त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेते व सलून व्यावसायिक यांची चाचणी करण्यास दिलेल्या आदेशानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रात एक सलून व्यावसायिक व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित सापडले. तर शुक्रवारी एका भाजी व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. तर दुसरा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. त्याच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी दुपारी त्या भाजी विक्रेत्यास अचानक त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक मृत्यूने शहरात खळबळ उडाली. भाजी विक्रेते व सलून व्यावसायिकांना झालेल्या कोरोना बाधेमुळे शहरवासीयांच्या दक्षतेसाठी प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सलून व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश दिल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात केली.
प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक सूचना सलून व भाजी व्यवसायिक यांना देण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्याधिकारी यांना व्यावसायिकांना तपासणी करण्याच्या नोटीस द्या, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना चाचणीच्या अहवालांकडे लक्ष
मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोडामार्ग शहर कोरोनामुक्त होते. त्यावेळी भाजी व्यावसायिकांची आरोग्य तपासणी केली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. प्रशासनाकडून ती करण्यात येत आहे. त्यामुळे सलून व भाजी व्यावसायिकांच्या अहवालांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.