समुद्रात जहाजाच्या सिग्नलमुळे खळबळ
By admin | Published: September 22, 2016 12:36 AM2016-09-22T00:36:48+5:302016-09-22T00:36:48+5:30
सुरक्षा यंत्रणा सतर्क : कवडा रॉक परिसरातील प्रकार
मालवण : कवडा रॉक परिसरात १२ ते १५ वाव खोल समुद्र्रात अज्ञात जहाजाचे धोक्याचे संकेत (सिग्नल) मालवण व तळाशील येथील मच्छिमारांना दिसून आल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे. हे जहाज मालवाहू असण्याची शक्यता आहे. अद्ययावत संकेतप्रणाली बसविण्यात आलेल्या या जहाजाने तब्बल नऊवेळा सिग्नल दिले असल्याने हे सिग्नल धोक्याचे असल्याचे मालवण येथील प्रत्यक्षदर्शी मच्छिमारांनी सांगितले.
मच्छिमारांनी या घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली आहे. हे जहाज दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वेंगुर्ले, तसेच निवती समुद्रात या जहाजाचा मोठा आवाज आल्याने तेथील मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे जहाज मालवण किनारपट्टीवर दाखल झाले असून, अंधार पडल्याने जहाज नेमके कसले आहे, हे सांगणे कठीण होते. मात्र, रात्री ८ वाजता या जहाजाने चार पिवळे, दोन हिरवे, तर तीन लाल सिग्नल दाखविल्याचे सांगण्यात आले. हे जहाज १० ते १५ वाव खोल समुद्र्रात असून, आचऱ्याच्या दिशेने संथ गतीने पुढे सरकत असल्याची माहिती तळाशील येथील मच्छिमारांनी दिली. याबाबत मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधून माहिती दिली आहे. (प्रतिनिधी)
जहाज कोस्ट गार्डचे
याबाबत मच्छिमारांनी माहिती घेतली असता हे जहाज मालवाहू नसून ते कोस्टगार्ड विभागाचे असल्याचा संदेश आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र्र शिंदे यांना मिळाला आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी घाबरू नये, असे आवाहन करताना हे जहाज रात्रीचे पेट्रोलिंग करण्यासाठी आले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून सागरी सुरक्षेसाठी कोस्ट गार्ड यंत्रणेकडून समुद्रात पेट्रोलिंग व्हावे, अशी मागणी होती. तशा पद्धतीचे हे पेट्रोलिंग असू शकते, असे तोरसकर यांनी सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती.
सिग्नल कशासाठी?
हे जहाज नेमके कोणते होते, हे अंधारामुळे समजणे कठीण झाले असले तरी जहाजाने सिग्नल नेमके कशासाठी दिले? जहाजाच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला का? याबाबत मच्छिमारांमध्ये संभ्रम असून, समुद्र्रात वादळसदृश स्थिती असल्याने या जहाजाने किनारपट्टीचा आसरा घेतला तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या घटनेमुळे जिल्हा सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.