सेतू कर्मचारी पगाराविना
By admin | Published: March 11, 2015 11:23 PM2015-03-11T23:23:43+5:302015-03-12T00:03:00+5:30
उपासमारीची वेळ : दोन महिने वेतनच नाही
असगोली : येथील सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहेत. यामुळे सध्या ऐन शिमगोत्सवात येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या सेतू कार्यालय आॅनलाईन करुन तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या अखत्यारित काम करणारे सर्व कर्मचारी नियमितपणे काम करत असूनही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. येथील कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तहसीलदार वैशाली पाटील निवेदन दिले आहे.
जानेवारी २०१५पासून गुहागरातील सेतू कार्यालय आॅनलाईन करुन तहसील कार्यालयाच्या ताब्यात घेण्यात आले. या कालावधीत पूर्वी कंत्राट पद्धतीमध्ये काम करणारे व सध्या तहसील कार्यालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या सेतू कार्यालयामधील सर्व पाच कर्मचाऱ्यांनी आपले नियमित काम केले.
जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन अद्याप त्यांना देण्यात आलेले नाही. हे सर्व कर्मचारी दरमहा मिळणाऱ्या तूटपुंज्या वेतनावरच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता अद्याप आपल्याला शासनाच्या वरिष्ठ पातळीवरुन सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना द्यावयाचा पगाराच्या रकमेबाबत आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर नाईलाजास्तव हे सेतू कार्यालय बंद करण्याची वेळ येणार असल्याचे या दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे.
निवेदनासंदर्भात गुहागर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते, यावर या सेतू कार्यालयाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे संभाव्य हाल लक्षात घेऊन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी....
येत्या सात दिवसात कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत योग्य तो निर्णय व कार्यवाही न झाल्यास पुढे होणाऱ्या परिणामास कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचेही निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि उपविभागीय कार्यालय, चिपळूण यांनाही देण्यात येणार आहेत. याप्रकरणी गांभीर्याने लक्ष पुरवण्याची मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.