जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५५ आरोग्य उपकेंद्रांवर सेवा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:04 PM2020-12-22T18:04:58+5:302020-12-22T18:07:35+5:30
sindhudurg Health News- जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ५५ आरोग्य उपकेंद्रांवर आता आरोग्य सेवा मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तेथे बीएएमएस किंवा बीएससी नर्सिंग डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ओरोस : जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील ५५ आरोग्य उपकेंद्रांवर आता आरोग्य सेवा मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तेथे बीएएमएस किंवा बीएससी नर्सिंग डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. यासाठी इन कॅमेरा समुपदेशन पद्धत राबविण्यात आली. समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून हे नियुक्ती मिळालेले कर्मचारी काम करणार आहेत.
ग्रामीण भागातील उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने बीएमएस किंवा बीएससी नर्सिंग कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार यापूर्वी ९५ समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
नव्याने ८ महिन्यांपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी राज्यस्तरावरील सहा महिन्यांचे प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते. या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६० उमेदवार दाखल झाले होते. यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातील ५६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड करून राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला यादी कळविली होती. या यादीनुसार पात्र उमेदवारांना उपकेंद्रे निश्चित करून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया इन कॅमेरा पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. पात्र ठरलेले ५६ पैकी ५५ उमेदवार उपस्थित राहिले होते. त्या सर्वांना नियुक्ती देण्यात आली.
प्रशासनाची गरज लक्षात घेऊन यादी
समुपदेशन पद्धत राबविण्यापूर्वी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोणत्या उपकेंद्राला समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची गरज आहे ? याची यादी तयार केली होती. ती यादी पात्र उमेदवारांसमोर ठेवून इन कॅमेरा समुपदेशन करण्यात आले. यादीतील उपकेंद्राप्रमाणे मागणी केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.