समुद्रात मच्छिमार नौका उलटण्याचे सत्र सुरूच

By Admin | Published: August 20, 2016 12:05 AM2016-08-20T00:05:45+5:302016-08-20T00:10:00+5:30

धुरीवाडा किनारी घटना : आठवड्यात चौथा प्रकार

Session of fishermen boat reverse in the sea | समुद्रात मच्छिमार नौका उलटण्याचे सत्र सुरूच

समुद्रात मच्छिमार नौका उलटण्याचे सत्र सुरूच

googlenewsNext

मालवण : गेले काही दिवस समुद्रात सकाळच्या वाऱ्याचा वेग कायम असून, लाटांनीही जोर पकडला आहे. याचा फटका मासेमारी नौकांना बसला असून, आठवड्याभरात समुद्रात चार नौका उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. राजकोट, वायरी, मुणगे (ता. देवगड) आणि आता पुन्हा शहरातील धुरीवाडा चिवला बीच समुद्रात शुक्रवारी भल्या पहाटे नौका उलटण्याची घटना घडली आहे. नौकेतील चारही मच्छिमारांनी पहाटेच्या काळोखात उसळणाऱ्या लाटांचा सामना करीत किनारा गाठला. धुरीवाडा येथील तुळशीदास गोवेकर यांची ‘कृष्णा’ मासेमारी नौकेसह इंजिन व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होतो, अशी मच्छिमारांची भावना असते. मात्र, समुद्र अजूनही शांत झाला नसल्याने मच्छिमारांना मासेमारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढत असल्याने जोरदार लाटा उसळत असून, शुक्रवारी पहाटे ‘कृष्णा’ मासेमारीस गेलेली नौका
पलटी झाली. यात मंगेश खोर्जे, नामदेव अडुवरेकर, अरुण जोशी व सुशांत गोवेकर हे चौघे मच्छिमार होते. किनारपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर जोरदार लाटांच्या तडाख्यात नौका पलटी झाली. काळ्याकुट्ट अंधारात चारही मच्छिमारांनी उसळणाऱ्या लाटांचा सामना करत किनारा गाठला. (प्रतिनिधी)

...तर मत्स्य कार्यालयास टाळे ठोकणार
खवळलेल्या समुद्रात नौका उलटण्याच्या घटना घडत आहेत. पंचनाम्यासाठी अधिकारी उपस्थित होत नाहीत. अन्य कागदपत्रांची पूर्तता धीम्या गतीनेच सुरू आहे. याबाबत मालवण, तळाशील, धुरीवाडा व दांडी येथील मच्छिमारांनी मत्स्य कार्यालयावर धडक दिली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. प्रभारी साहाय्यक मत्स्य आयुक्त ‘नॉट रिचेबल’ तर आठ दिवसांपूर्वी हजर झालेले अधिकारीही सुट्टीवर गेले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न आपल्या अखत्यारित नाही, असे सांगत हात वर केले. त्यामुळे संतप्त बनलेल्या मच्छिमार प्रतिनिधी बाबी जोगी, दिलीप घारे, संजय केळुस्कर, सन्मेश परब यांच्यासह अन्य मच्छिमारांनी अधिकारी हजर न झाल्यास सोमवारी मालवण येथील जिल्हा मत्स्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Session of fishermen boat reverse in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.