अभूतपूर्व उत्साहात शिक्षक परिषदेचे अधिवेशन
By admin | Published: February 9, 2015 09:59 PM2015-02-09T21:59:59+5:302015-02-10T00:27:24+5:30
महत्त्वपूर्ण चर्चा : रामनाथ मोते यांच्या उपस्थितीत शिक्षकांना मार्गदर्शन
वाटुळ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागाचे द्वैवार्षिक अधिवेशन चिपळूण येथे युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये माजी आमदार अशोक मोडक, नीता माळी, कवीवर्य प्रा. अशोक बागवे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते अशा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.अधिवेशनाला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मोडक, संयोजक गंगाराम इदाते यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ‘संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर मोडक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये मुंबई येथील लेखीका नीता माळी यांनी ‘शिक्षकांची उपक्रमशिलता’ या विषयावर बहुविध उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.या अधिवेशनाचे उद्घाटक माजी आमदार विनय नातू स्वागताध्यक्ष माधव गवळी, शिक्षक आमदार मोते, शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांच्या उपस्थितांमध्ये जिल्हा गुणगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभाग अध्यक्ष शंकर मोरे, कार्यवाह सुधाकर तावडे, सहकार्यवाह रवींद्र इनामदार, जिल्हा अध्यक्ष रमेश जाधव, बागवे, माळी संयोजक इदाते उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन आनंद त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय नातू यांनी या उपक्रमांचे कौतुक करीत शासनाने माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार द्यावेत, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे अभिवचन दिले.
गुणगौरव सोहळ्यानंतरचे सत्र खऱ्या अर्थाने गाजविले, ते प्रख्यात कवीवर्य प्रा. बागवे यांच्या अमोघ वक्तृत्त्वाने. आपल्या दीड तासाच्या मार्गदर्शनामध्ये प्रचंड हास्यविनोद करत शिक्षकाना खिळवून ठेवले. बागवे यांची व्याख्याने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी खास पर्वणी ठरली. शिक्षकांच्या पेन्शन समस्या या विषयावर ठाणे येथील व्यक्तीमत्त्व खेमानी यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अंतिम सत्रामध्ये मोते यांनी शंका-समाधान या खुल्या चर्चा सत्रामध्ये शिक्षकांच्या अनेक समस्यांवर मार्गदर्शन केले. सध्या राज्यात शासकीय अधिकारीच शासन चालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांच्या समस्यांची चांगली माहिती असून अल्पावधीतच संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, शिक्षण सेवकांची सेवा यावर ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले.
दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाची सांगता मोते यांच्या मार्गदर्शनाने झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षक परिषद, चिपळूण तालुका कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. जिल्हा कार्यवाह राधाकृष्ण जोशी यांनी आभार मानले. या अधिवेशनात राज्यभरातून शिक्षक प्रतिनिधी, नेतेमंडळी चिपळुणात दाखळ झाली होती. शिबिराचे संयोजन उत्तम होते. (वार्ताहर)