Coronavirus Unlock : नियम धाब्यावर, कणकवली बाजारपेठेत गर्दी, खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:47 PM2020-07-02T15:47:06+5:302020-07-02T15:51:09+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत सकाळी ८ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पूर्णत: धाब्यावर बसविण्यात आला होता.
कणकवली : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत सकाळी ८ वाजल्यापासून आठवडा बाजार भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पूर्णत: धाब्यावर बसविण्यात आला होता.
बाजारपेठेत वारंवार होणाऱ्या अशा गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असतानाही त्याकडे अनेक नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण कसे आणणार? असा प्रश्न प्रशासन, नगरपंचायत तसेच पोलिसांना पडला आहे.
कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ व डिपीरोड या दोन्ही रस्त्यांवर काही जीवनावश्यक वस्तंूची दुकाने चालू आहेत. त्यामुळे किराणामालाचे दुकान, भाजी-पाला, औषधे, कांदे, बटाटे, दूध हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांकडून मर्यादित अंतर ठेवण्याचा नियम पायदळी तुडविला जात आहे. काही औषध दुकाने तसेच अन्य काही दुकानांमध्ये साहित्य खरेदी करताना ३ फुटांचे मर्यादित अंतर नगरपंचायतीने मारून दिलेल्या चौकोनात उभे राहून पाळले जात आहे.
मात्र, कणकवली बाजारपेठ व डिपी रोड, तेलीआळी या रस्त्यांवर अत्यंत धोकादायक पद्धतीने गर्दी होत आहे. नागरिक कुठलाही विचार न करता थेट रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कणकवलीसह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, त्याचे गांभीर्य नसलेल्या नागरिकांना कोण रोखणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस आपला जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी कडक कारवाईचे पाऊल उचलले की, त्यांना दोष देत कारवाई न करण्याची मागणी अनेकांकडून केली जाते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येत आहेत.
बाजारात तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे आपला स्वत:चा जीव तर धोक्यात घालतच आहेत. त्याचबरोबरच इतरांच्या जीवलाही धोका निर्माण करीत आहेत. याचे भान त्यांना राहत नाही. हे मोठे दुर्दैव आहे. नागरिकांनी यापुढे तरी निदान घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कणकवली नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.