रस्त्याविना जनतेची परवड सुरूच
By admin | Published: February 20, 2015 10:34 PM2015-02-20T22:34:04+5:302015-02-20T23:12:25+5:30
आचिर्णे धनगरवाडा : निवडणुकांना होते आश्वासनांचे नूतनीकरण
प्रकाश काळे - वैभववाडी दीड-पावणेदोनशे लोकवस्तीच्या आचिर्णे धनगरवाड्यावरील जनतेची रस्त्याविना परवड सुरूच आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीला स्थानिक नेत्यांकडून रस्त्याच्या आश्वासनांचे ‘नूतनीकरण’ केले जाते. परंतु, निवडणुकांनंतर त्याच नेत्यांना नूतनीकरण केलेल्या आश्वासनाचा विसर पडत असल्याने शिक्षण, आरोग्यासह जीवनावश्यक गरजांसाठी तेथील जनतेची पिढ्यान्पिढ्या पायपीट सुरू आहे. आचिर्णेच्या ग्रामपंचायतीपासून ५ किलोमीटर अंतरावर धनगरवाडा ही वस्ती आहे. या अंतरापैकी मोईनवाडी-कासारवाडीपर्यंत बारमाही रस्ता आहे. मात्र, तिथून पुढे ३ किलोमीटरवर धनगर समाजाची वस्ती असून, कासारवाडीपासूनची संपूर्ण पायवाट जंगल भागातील खाचखळग्यातून जाते. सन २००० मध्ये ग्रामपंचायतीच्या दप्तरी २६ नंबरला धनगरवाडा रस्त्याची नोंद होऊन किरकोळ खर्च केला गेला. मात्र, त्यानंतर गेल्या १५ वर्षांत या पायवाटेवर शासनाच्या कोणत्याही योजनेतून छदामही खर्ची पडू शकलेला नाही. आचिर्णे धनगरवाड्यावर नाही म्हणायला चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे पाचवीपासून पुढच्या शिक्षणासाठी चिमुकल्यांना पावसाळ्यात नाले तुडवत झाडाझुडपातून पायपीट करावी लागते. गेल्या १५ वर्षांच्या काळात आचिर्णे गावाला काही दिवसांचे सभापतिपद, त्यानंतर ३ वर्षे उपसभापती आणि सध्या जिल्हा परिषद सदस्य आचिर्णेतील आहेत. परंतु, या पदांचा वापर धनगरवाड्यांवर जाणाऱ्या पायवाटेचे रस्त्यात रूपांतर करण्यासाठी होऊ शकला नाही. याची चीड तेथील रहिवाशांच्या बोलण्यातून जाणवते. रस्त्याअभावी आचिर्णे धनगरवाड्यांवरील जनतेला दगड, धोंडे तुडवून रेशन, दळण, किराणा मालासाठी पायपीट करून गावात यावे लागते. तेथून डोक्यावर ओझे घेऊन वस्तीवर परतताना अक्षरश: नाकीनऊ येतात. तेथील आजारी व्यक्ती, वृद्ध तसेच गर्भवती महिलांना तर आजही डोलीचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आचिर्णेच्या धनगरवाड्यावरील जनतेचे रस्त्याच्या अभावी प्रचंड हाल होत असताना शासन दरबारी मात्र ही वस्ती दुर्लक्षित राहिली आहे.