प्रलंबित कामांचा निपटारा करा
By admin | Published: August 12, 2015 11:20 PM2015-08-12T23:20:09+5:302015-08-12T23:20:09+5:30
स्नेहलता चोरगे : वैभववाडी तालुका विकास समिती सभा
वैभववाडी : विकास कामांना गती देण्यासाठी आढावा सभा घेतल्या जातात. मात्र, प्रत्येक वेळी तीच ती कामे प्रलंबित दिसत आहेत. हे योग्य नसून अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून पुढील विकास समितीच्या सभेपूर्वी प्रलंबित कामांचा निपटारा करावा, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी तालुका विकास समितीच्या सभेत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर चोरगे व गटविकास अधिकारी सदानंद पाटील यांनी आसूड ओढले.तालुका विकास समितीची सभा स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. सभेला सभापती वैशाली रावराणे, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव व खातेप्रमुख उपस्थित होते.
चोरगे पुढे म्हणाल्या की, ग्रामपंचायत हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्याचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीना विश्वासात घेऊन विकासाचा समतोल साधणे आवश्यक आहे. विकास प्रक्रियेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे योगदान सारखेच असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायतींनी विकास कामांची भूमिपुजने व उद्घाटने करावीत. तसेच कामे मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
विकास कामांचा आढावा घेताना गटविकास अधिकारी पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत वैभववाडी तालुका गेली ३ वर्षे ५0 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. त्याला सर्व विभागांच्या यंत्रणा जबाबदार असल्याचे स्पष्ट करीत प्रत्येक विभागाने दर आठवड्याच्या गुरुवारी आपल्याला अहवाल द्यावा. ज्यांचा अहवाल प्रत्येक गुरुवारी मिळणार नाही त्यांचा गोपनीय अहवाल आपण मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठविणार असल्याचे गटविकास अधिकारी पाटील यांनी सांगितले.
बाजारपेठेतील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या आवारात अतिक्रमण सुरु झाले आहे. ते वेळीच थांबवा. कारण अतिक्रमण वाढले तर ते नंतर हटविणे अवघड होईल. त्यामुळे विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीचा विनियोग करुन विश्रामगृहासह परिसर सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी पाटील यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या.
तालुक्यातील २३ शाळांमध्ये गेल्यावर्षी सेमी इंग्रजी सुरु झाली. मात्र त्यातील १0 शाळांमध्येच यावर्षी सेमी इंग्रजी सुरु आहे. सेमी इंग्रजीसाठी तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नव्हते तर ते सुरू करण्याची घाई का केली. ज्या शाळांनी सेमी इंग्रजी यावर्षी बंद केले तेथील विद्यार्थ्यांची अवस्था काय? असा प्रश्न कुर्ली सरपंच सूर्यकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी तालुक्यात सेमी इंग्रजी शिकवू शकणारे केवळ दोनच शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे सेमी सुरु ठेवायचे की नाही याचे सर्वाधिकार व्यवस्थापन समितीचे आहेत. (प्रतिनिधी)
चौकशी लावू का : स्नेहलता चोरगेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींच्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. असे सुनावत कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना एकदा तालुक्यातील रस्त्यांवरुन सैर घडवा. म्हणजे रस्त्यांच्या स्थितीकडे त्यांचे लक्ष जाईल, असे स्नेहलता चोरगे यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना फटकारले. तोच संदर्भ पकडून वर्षभरात रस्ते खराब होतातच कसे ? असा सवाल करीत मी माझ्या अधिकारात सर्व रस्त्यांच्या कामांची ‘क्वॉलिटी कंट्रोल’मार्फत चौकशी लावू का? असे गटविकास अधिकारी पाटील यांनी विचारणा केल्यावर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी निरुत्तर झाले.
सभेकडे लोकप्रतिनिधींची पाठ
महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या तालुका विकास समितीच्या सभेला सभापती वैशाली रावराणे व ३५ पैकी चार गावचे सरपंच उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य काँग्रेसचे असूनही उर्वरित ७ जणांनी सभेकडे पाठ फिरवली. त्यावरुन काँग्रेसचाच चोरगेंना विरोध आहे की काय ? अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत चोरगे यांना विचारले असता, लोकप्रतिनिधींचे काहीतरी महत्वाचे काम असेल असे सूचित करून अधिक भाष्य टाळले.