सावंतवाडीत परप्रांतीय विरूद्ध स्थानिक संघर्षांवर तोडगा
By अनंत खं.जाधव | Published: December 8, 2023 01:21 PM2023-12-08T13:21:59+5:302023-12-08T13:22:35+5:30
सावंतवाडी : सावंतवाडीत सध्या कर्नाटकातील परप्रांतीय मुकादम बांधकाम व्यवसायासाठी स्वतःचीच वाहने वापरत असल्याने स्थानिक टेम्पो चालक-मालक यांचा धंदा होत ...
सावंतवाडी : सावंतवाडीत सध्या कर्नाटकातील परप्रांतीय मुकादम बांधकाम व्यवसायासाठी स्वतःचीच वाहने वापरत असल्याने स्थानिक टेम्पो चालक-मालक यांचा धंदा होत नाही. त्यामुळे परप्रांतीय मुकादमांनी स्वतःची वाहने बंद ठेवावी आणि पूर्वी सारखा स्थानिकांना धंदा द्यावा यावरून गेले आठवडाभर स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असा संघर्ष सुरू होता. यावर गुरूवारी रात्री उशिरा तोडगा एकमताने तोडगा काढण्यात आला. यात उद्योजक शैलेश पई यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली.
यावेळी परप्रांतीय मुकादम यांनी वाहतूक व्यवसायात उतरणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वादावादी शिवाय तोडगा निघाला. ही बैठक येथील आदिनारायण मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक टेम्पो चालक-मालक यांच्यासह परप्रांतीय मुकादम उपस्थित होते.
बैठकीत परप्रांतीयांवर अन्याय नको म्हणून पहिले भाडे स्थानिकांना देवून त्यांनी आपल्या कामासाठी गाडी वापरण्यास हरकत नाही, असा निर्णय घेण्यात आला. आमच्या सारखे टेम्पो चालक- मालक सुध्दा व्यावसायिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे परप्रांतीय मुकादम यांनी स्पष्ट केले.
भविष्यात त्यांच्याकडून सहकार्य न झाल्यास आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. त्यामुळे एकमताने झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूने तोडगा काढण्यात आला. मुकादमांचे नुकसान नको. म्हणून त्यांनी आपल्या कामासाठी गाडी वापरण्यास मुभाही यावेळी देण्यात आली आहे. मात्र पहिले भाडे हे स्थानिकालाच द्यावे,अशी अटही स्थानिकांमधून घालण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी घोगळे म्हणाले, दोन्ही बाजूने चर्चा करुन वाद मिटविण्यात आला आहे. परप्रांतीय मुकादमांनी आपण माघार घेतली आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तरीही काही प्रमाणात त्यांना त्यांच्या वैयक्तीक कामासाठी सुट देण्यात येणार आहे. त्यातील काही मुकादमांनी आपण सहकार्य करू, असे मान्य केले आहे. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठींबा आहे.
परंतू कोणी या ठिकाणी नियम मोडत असेल तर त्याला आम्ही आमच्या पध्दतीने जाब विचारू, तसेच विरोधी मुकादमांकडून आमच्या स्थानिक संघटनेच्या पदाधिकार्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या, त्या त्यांनी तात्काळ मागे घ्याव्यात. अशा सुचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. यावेळी उद्योजक शैलेश पई, बिल्डर नीरज देसाई, सुहास सातोसकर, दादा खोर्जुवेकर, देवेंद्र टेमकर, बावतीस फर्नांडिस, बेटा नार्वेकर आदि उपस्थित होते.