कोयती डोक्यात मारल्याप्रकरणी सात आरोपी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:49 PM2020-02-07T15:49:34+5:302020-02-07T15:51:52+5:30
जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी कोयती डोक्यात मारीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुसबे मधलीवाडी येथील सात आरोपींना जिल्हा वर्ग १ व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरविले आहे. यात आरोपींची शिक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुनावली जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी कोयती डोक्यात मारीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुसबे मधलीवाडी येथील सात आरोपींना जिल्हा वर्ग १ व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरविले आहे. यात आरोपींची शिक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुनावली जाणार आहे.
कुसबे मधलीवाडी येथील नामदेव नारायण घाडीगांवकर व तक्रारदार कुसबे बौद्धवाडी येथील अशोक तुकाराम जाधव यांच्यात पोखरण कुसबे येथील सर्व्हे नंबर ५२/४ च्या जमीन मालकीवरून वाद होता. हा वाद ३० ते ३५ वर्षे सुरू होता. याबाबत प्रांताधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल झाल्याने तो न्यायप्रविष्ट होता.
१० नोव्हेंबर २०१५ रोजी तक्रारदार अशोक हे आपला मुलगा अजय यांच्यासह भातशेतीच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी आरोपी भातकापणी करीत होते. यावेळी अशोक व साक्षीदार अजय हे तेथून जात असताना आरोपी नामदेव घाडीगांवकर (६०), सखाराम पांडुरंग घाडीगांववर (४९), अरुण तुकाराम घाडीगांवकर (४५), मोहन सीताराम घाडीगांवकर (४५), अनिता अरुण घाडीगांवकर (४०), अस्मिता सखाराम घाडीगांवकर (३८), मयुरी मोहन घाडीगांवकर (३५) यांनी अडवून बेकायदा जमाव करीत अशोक व अजय यांना चिव्याच्या दांड्याने मारहाण केली.
आरोपी मोहन घाडीगांवकर यांनी आपल्या हातातील कोयती अशोक यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. नामदेव घाडीगांवकर यांनी अशोक यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच इतर आरोपींनीही त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
याबाबत अशोक जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सातही आरोपींविरोधात भादवि कलम अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९च्या कायद्यानुसार तसेच इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्वांना अटक करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले
निकाल ११ फेब्रुवारीला दिला जाणार
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात तक्रारदार अशोक, साक्षीदार अजय, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी तपासिक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. यात सर्व सातही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याचा निकाल ११ फेब्रुवारी रोजी दिला जाणार आहे.