Sindhudurg: नाटळ ग्रामसभा हाणामारी प्रकरणी आणखी सात जणांना अटक, दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार
By सुधीर राणे | Published: June 18, 2024 12:40 PM2024-06-18T12:40:17+5:302024-06-18T12:40:53+5:30
२० जणांवर गुन्हा दाखल
कणकवली: नाटळ ग्रामसभेत ३ जून रोजी दुपारी भाजप व उद्धवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीपोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाच्या वीस जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली. तर सोमवारी आणखीन सात जणांना अटक करण्यात आली. त्यांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये गणेश मारुती सावंत (वय ३२), ऋषिकेश मारुती सावंत (३७ ), रमाकांत लक्ष्मण घाडीगावकर (५२ ), सचिन पांडुरंग सावंत, अभिषण शामराव सावंत, संजय शांताराम सावंत, रमेश रामचंद्र नाटळकर (सर्व राहणार नाटळ, ता.कणकवली) यांचा समावेश आहे.
संशयित आरोपी विरोधात भादवि कलम ३०७,३२४,३२३, ३५२, ५०४,१४३,१४७,१४८,१४९ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे ३ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, पोलिस हवालदार मिलिंद देसाई व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत खोपडे, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके आदी कर्मचाऱ्यांनी ही अटकेची कारवाई केली आहे.
या हाणामारी प्रकरणी दिनानाथ पंढरीनाथ सावंत व नाटळ तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.