सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: February 2, 2015 10:42 PM2015-02-02T22:42:31+5:302015-02-02T23:50:38+5:30
चिपळूणचा प्रश्न : तातडीने लक्ष दिले तर प्रश्न सुटेल
चिपळूण : सध्या शहर व परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहात असून, सांडपाणी वाहून नेण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवळकोट भागात नाल्याच्या बाजूला भराव टाकला जात असल्याने या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.चिपळूण शहरात भुयारी गटार योजना राबवण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अजूनही कागदावरच आहे. शहरातील काही कौलारु घरे आता सिमेंटची होत आहेत, तर काही भागात हौसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक सोसायटीने सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करणे काळाची गरज असताना सांडपाणी नगर परिषदेच्या गटारांमध्ये सोडले जात आहे.चिपळूणचा सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. सध्या काही बिल्डर गोवळकोटसारख्या भागाकडे आकर्षित झाले असून, या भागातही इमारती उभ्या राहात आहेत. गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नैसर्गिक नाल्याशेजारी एका इमारतीचे बांधकाम वेगात सुरु आहे. मात्र, नाल्याच्या बाजूलाच मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने भविष्यात या मार्गावरील सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गोवळकोट परिसरात एक नैसर्गिक नाला असून, नगर परिषद प्रशासनाने इमारतीला परवानगी देताना हा नाला बंद होणार नाही, याची दक्षता घेऊन परवानगी देणे आवश्यक होते. नैसर्गिक नाल्यांच्या काही जागा या खासगी मालकांच्या असून, हे नाले-पऱ्हे प्रशासनाने आपल्या ताब्यात न घेतल्याने भविष्यात या भागातील सांडपाणी प्रश्नही गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत. रहदारीच्या मार्गावर असणारा हा नाला बंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या नाल्यातील पाणी रस्त्यावर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
चिपळूण शहरात अनेक ठिकाणी नाल्यावर बांधकामे सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. गोवळकोट, रावतळे, पेठमाप. शंकरवाडी भागात असे प्रकार होत असल्याने तेथील नैसर्गिक नाल्यावर काही बांधकामे होत असल्याने तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आता येथे चौकशीची मागणी केली जात आहे.
चिपळूण शहराच्या गोवळकोट भागात असलेला नैसर्गिक नाला बुजवून जे बांधकाम झाले आहे, त्याबाबत तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने असे प्रकार वाढत आहेत. या प्रकाराना आळा बसावा, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)