शरद पवारांच्या गुगलीमुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले, नितेश राणेंनी लगावला टोला
By सुधीर राणे | Published: June 30, 2023 01:37 PM2023-06-30T13:37:20+5:302023-06-30T13:37:46+5:30
शरद पवार समजायला आम्हाला जर शंभर जन्म घ्यावे लागणार असतील, तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील.
कणकवली : शरद पवार समजायला आम्हाला जर शंभर जन्म घ्यावे लागणार असतील, तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील. पवार यांच्या गुगलीमुळे पहाटेच्या शपथविधीत जशी अजित दादांची विकेट पडली, तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही विकेट पाडली आहे असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी उद्धव ठाकरे यांनी सोडली. त्यामुळे त्यांना बाजूला करून ५० योध्दे सोबत घेवून शिंदे - फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसविले. आज त्या स्वाभिमानाची वर्ष पूर्ती आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्ष पूर्ती आहे.
फक्त नातेवाईकच शिल्लक
आदित्य ठाकरे यांचे जवळचे आणि कट्टर असलेले राहुल कणाल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा आदित्य ठाकरे यांना फार मोठा राजकीय धक्का आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. तसा वरूण सरदेसाई हा आदित्य ठाकरेंकडे शकुनी मामा आहे. त्याच्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या आजू बाजूला फक्त नातेवाईक शिल्लक राहिले आहेत. त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून चालले आहेत.
वरूण सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इच्छूक
कोविड सेंटर भ्रष्ट कारभारात वरूण सरदेसाई यांचा मोठा वाटा असून सूरज चव्हाण यांच्या जबाबात त्याचा सर्वत्र उल्लेख आला आहे. आता सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इच्छूक आहेत. ते कुठे कुठे भेटून पक्षात घेण्याची विनंती करत असतात हे आम्ही लवकरच सांगू.
राऊतांनी फक्त पत्रकारिता करावी
शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम राऊत, सरदेसाई करत आहेत असेही आमदार राणे यावेळी म्हणाले. खासदार संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंगचे काम करत आहेत का? त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल काय माहीत आहे. त्यांनी फक्त पत्रकारिता करावी. असेही राणे म्हणाले.