सामायिक सातबाराधारकांना तिसरे अनुदान ठरणार वरदान
By admin | Published: November 5, 2015 12:15 AM2015-11-05T00:15:53+5:302015-11-05T00:20:10+5:30
निधी मंजूर : नुकसानभरपाई घेऊन जाण्याचे आवाहन...
सुभाष कदम===चिपळूण अवेळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. ज्यांचे सातबारा एकेरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, सामायिक सातबारा उतारे असणाऱ्या बागायतदारांना आता तिसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागणार आहे. ही रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती बागायतदारांना मिळणार आहे.
डिसेंबरनंतर आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येतो. त्यानंतर फळधारणा होण्याच्या काळातच गेल्यावर्षी पाऊस पडला होता. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. उरल्यासुरल्या मोहोरावर फळधारणा झाली होती. परंतु, जानेवारीनंतर पडलेल्या वादळी पावसाने त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच यावर्षीचे आंबा व काजूपीक हातचे गेले होते. त्यामुळे बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मागणी सुरु झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन नुकसानभरपाई जाहीर झाली.
ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने त्यांचे संमतीपत्र किंवा प्रत्येकाचे बँक खाते मिळणे गरजेचे होते. अनेकांनी आपले खाते नंबर किंवा काहींनी आपले प्रस्ताव तलाठ्यामार्फत जमा केले. त्यांना लाभ मिळाला. परंतु, ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे खातेदार या भरपाईपासून वंचित राहिले.
या खातेदारांना आता तिसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभार्थींना मिळाला लाभ
चिपळूण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर ६२ लाख ६१ हजार २५० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थींना लाभ देण्यात आला.
पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये अनुदान प्राप्त.
दुसऱ्या टप्प्यात ६२ लाख ६१ हजार २५० रुपये अनुदान प्राप्त.
तिसऱ्या टप्प्यात १ कोटी १६ लाख ८७ हजार १२० रुपये अनुदान येणे बाकी.
आतापर्यंत वैयक्तिक सातबाराधारकांना अनुदान प्राप्त.
सामायिक सातबाराधारकांना तिसऱ्या टप्प्यात मिळणार न्याय.