पोषण आहार बनवितानाच तिने केली शिक्षणाची हौस पूर्ण
By admin | Published: September 10, 2016 11:26 PM2016-09-10T23:26:59+5:302016-09-11T00:27:38+5:30
सायली बाणे : शिक्षिकांच्या अन् पतीच्या सहकार्याने झाली पदवीधर
शोभना कांबळे --रत्नागिरी --स्त्री - पुरूष समानता असा समाजाने कितीही नारा दिला असला, तरी अजूनही शिक्षणाचा हक्क महिलांना पूर्णपणे मिळतो, असे नाही. ग्रामीण भागात तर ही दरी अधिकच जाणवते. त्यातून एखाद्या स्त्रीचे लग्न झाले की मग मुलांच्या शिक्षणातूनच ती आपल्या शिक्षणाचे स्वप्न बघते. मात्र, ग्रामीण भागातील हे चित्र एका महिलेने बदलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडीबुद्रुक गावातील सायली सुरेश बाणे यांनी संसाराला हातभार लावण्यासाठी पोषण आहार बनविण्याचे काम करतानाच आपले पदवीधर होण्याचे स्वप्नही पूर्ण केले आहे.
सायली बाणे या पोमेंडीबुद्रुक - बाणेवाडीत राहतात. अतिशय दुर्गम असा हा ग्रामीण भाग. पती सुरेश बाणे हे कोकण रेल्वेत ‘ट्रॅकमन’ आहेत. मुलगी स्नेहा ही दहावीत तर मुलगा सुयश हा आठवीत शिकतोय. दोघेही रत्नागिरीतील पटवर्धन प्रशालेत शिकतात. आपल्या संसाराला हातभार मिळावा, या उद्देशाने सायली बाणे यांनी अल्पमोबदल्यावर गावात छोटीशी बालवाडी सुमारे पाच वर्षे चालविली. यातून त्यांची शिक्षणाची आवड अधिकच वाढली.
दहावी नापास झाल्याने लग्नापूर्वी त्यांचे शिक्षण थांबले होते. मात्र, आपण ते पूर्ण करून पुढे शिकावे, ही सुप्त इच्छा त्यांना होतीच. या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले, ते या गावातील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नीलिमा जोशी, अंजली कांबळे, केंद्रीयप्रमुख अनुराधा चौकेकर यांनी. सायली बाणे या शाळेत पोषण आहार बनविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांनी आपली इच्छा या शिक्षिकांना बोलून दाखवली. शिक्षणाची तळमळ बघून त्यांनी बाणे यांना मुक्त विद्यापीठात दहावीसाठी प्रवेश मिळवून दिला आणि त्याचे सार्थक करत सायली बाणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत चक्क ७० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. या परीक्षेने त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला.
पतीची नोकरी, मुलांच्या शिक्षणाची काळजी अशा गृहसंसाराची घडी बसवताना आपले पोषण आहाराचे काम सांभाळत त्यांनी तीन वर्षे पदवीचा अभ्यासही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केला आणि विशेष म्हणजे या परीक्षेतही द्वितीय श्रेणी मिळवत यश संपादन केले. यासाठी त्यांना महत्त्वाची साथ मिळाली ती पतीची. पोमेंडीसारख्या ग्रामीण भागात राहूनही त्यांनी आपल्या पत्नीच्या शिक्षणाच्या इच्छेला पूर्ततेची झालर देण्यास सहकार्याचा हात दिला. सायली बाणे खऱ्याअर्थाने आता पदवीधर झाल्या आहेत. घरच्यांंच्या सहकार्याने त्यांना संगणकाचा अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.