शिरगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक
By Admin | Published: July 18, 2016 10:51 PM2016-07-18T22:51:12+5:302016-07-19T00:23:18+5:30
शिक्षकाने विद्यार्थिनीला केला अश्लिल एसएमएस : गुन्हा दाखल होऊनही कारवाई नाही
शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक विनोद शिवाजी चौगुले (वय ३२) याने प्रशालेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीस मोबाईलवरून अश्लिल एसएमएस (संदेश) पाठविल्याप्रकरणी पालकांनी पोलिसात केलेल्या तक्रारीअंती अटक होऊन होऊनही प्रशालेच्या संस्थेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही म्हणून शिरगांव दशक्रोशीतील पालक व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ९ वाजता प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करीत संबंधित शिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली.
विनोद चौगुले याने प्रशालेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीस २३ एप्रिल ते १० मे या कालावधीत रात्री अपरात्री मोबाईलवरून अश्लिल संदेश पाठविले. याबाबत त्या विद्यार्थिनीने आपल्या वडीलांना कल्पना दिली. त्यानुसार वडिलांनी देवगड पोलिस स्थानकात चौगुले विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती. या शिक्षकावर यापूर्वीही विद्यार्थिनीशी गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी शिक्षण संस्थेने समाधानकारक कारवाई केली नाही व कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत चौगुले यांची यातून सुटका झाली. एकाच शिक्षकांकडून वारंवार घडणाऱ्या गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणामुळे शिक्षण संस्थेची, शाळेची व परिणामी गावांची नाहक बदनामी होत आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी असुरक्षित आहेत. अन्याय झालेल्या विद्यार्थिनीच्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले. वडील अपंग आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित शिक्षकावर पहिल्याच प्रकरणात शिक्षण संस्थेने योग्य त्या कारवाईचा बडगा उगारून निलंबित केले असते तर आजची आंदोलनाचा प्रसंग घडलाच नसता. पालकांच्या या शिक्षकाच्या घृणास्पद गैरवर्तनाबाबत तीव्र भावना आहेत. वादग्रस्त सहाय्यक शिक्षक चौगुले यास संस्थेने तत्काळ निलंबित करून चौकशी करावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा आंदोलनकर्त्यांनी यावेळी इशारा दिला व संस्था या शिक्षकाबाबत काय निर्णय घेणार ते लेखी द्यावे असे सांगितले.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांने सुमारे ५०० स्वाक्षऱ्यांचे निवेदन संस्थाचालकांना दिले. पालकांच्यावतीने माजी सरपंच अमित साटम, राजेंद्र शेट्ये, अंकुश नाईक, मंगेश धोपटे, सर्वोत्तम साटम, संतोष फाटक, सचिन देसाई, भाई आईर, सरपंच उषा चौकेकर, सुनिल तावडे, एकनाथ तावडे यांनी संस्था पदाधिकाऱ्यांशी याप्रकरणी चर्चा केली.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाताना संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. झालेला प्रकार हा निंदनीय असून याप्रकरणी संस्थेने एक सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरु केली आहे. पालक, ग्रामस्थांच्या भावनांचा संस्था आदर राखेल.
संस्था कोणासही पाठीशी घालणार नाही. चौगुले यांच्या निलंबनासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे आजच्या आज प्रस्ताव सादर करणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर त्याच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई संस्था करेल तोपर्यंत त्याला शाळेत हजर करून घेतले जाणार नाही असे संस्थेच्यावतीने आश्वासन दिले. यावेळी संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल सावंत, संस्था समन्वयक विजयकुमार कदम, मानद अधीक्षक रविंद्र जोगल, स्थानिक समिती सदस्य सुधीर साटम, संदीप साटम, अॅड. प्रकाश जाधव, वसंत नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना संस्थेच्यावतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले.(प्रतिनिधी)
क्षणचित्रे ...
शिरगांव बाजारपेठ ते प्रशालेच्या प्रवेशद्वारापर्यंत घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी त्या प्रकाराचा निषेध नोंदविला.
प्रवेशद्वारावर धरणे व घोषणाबाजी
विनोद चौगुलेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
संस्था चालकांना पालक व ग्रामस्थांनी निवेदन सादर करत संस्था चालकांशी चर्चा केली.
संस्थेच्यावतीने उपाध्यक्ष संभाजी साटम, रवींद्र जोगल, विठ्ठल सावंत, संदीप साटम आंदोलनकर्त्यांच्या सामोरे जात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
संस्थेचे पालकांना कारवाईचे लेखी आश्वासन
संस्थाचालक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी ओरोस येथे रवाना