वेंगुर्लेत १६ दिवसांचा शिमगोत्सव
By admin | Published: March 11, 2015 11:16 PM2015-03-11T23:16:43+5:302015-03-12T00:04:15+5:30
होळी उत्सव : वेगवेगळ्या प्रकारची सोंगे ठरतात आकर्षण
वेंगुर्ले : जिल्ह्यात ५ मार्चपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. काही गावांचे शिमगोत्सव प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे संपलेही असतील. पण वेंगुर्ले गावाने होळी उत्सवातही आपले वेगळेपण राखले आहे. यावर्षी वेंगुर्ले परिसरातील शिमगोत्सव १६ दिवस म्हणजेच अमावस्येपर्यंत चालणार आहे. वेंगुर्ले पूर्वस मंदिर येथे होळीचा मुख्य मांड आहे. होळी दिवशी इथे देव होळी व गाव होळी अशा पोफळीच्या दोन होळ्या उभ्या केल्या जातात. गावातील प्रत्येक वाड्यात होळी असली, तरी लोक या मांडावर न चुकता हजेरी लावतात व होळीला यथाशक्ती नवस बोलतात. वाड्यातील रोंबाटेही पहिल्यांदा या मांडावर येतात व नंतर आपापल्या वाड्यांमध्ये फिरतात. दरवर्षी इथल्या शिमगोत्सवाचे दिवस बदलत असतात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येला वेंगुर्ले गावच्या शिमगोत्सवाची सांगता होते. त्यामुळे कधी १४, १५ तर कधी १७ दिवस हा शिमगोत्सव चालतो. यावर्षी १६ दिवस शिमगोत्सव चालणार आहे. शिमगोत्सव सुरू झाला की, लोक वेगवेगळ्या प्रकारची सोंगे करमणूक करीत शबय मागतात. पूर्वीपेक्षा शबय मागण्याचे प्रमाण शहरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. सुशिक्षित पिढी हा प्रकार अंगिकारण्यास नाकारत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आपला शिमगा आटोपून वेगुर्ले येऊन लोकांची करमणूक करीत शबय मागत आहेत. अलिकडेच कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील असेच मेळ वेंगुर्लेत दाखल होत आहे. वाघ, सिंह, कोल्हा, राक्षस, मारुती व लेझीम खेळणारी लहान मुले असा लवाजमा विविध गाण्यांच्या चालीवर नृत्य करून येथील नागरिकांची वाहवा मिळवत आहेत.
फेसबुक, व्हॉटस्अॅप, हाईक आदी इंटरनेटच्या जमान्यातही नेरूर येथील लहान मुले शिमगोत्सवात करमणूक करण्याचा वारसा जपत आहेत, ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. येथील नागरिकही त्यांचा यथोचित पाहुणचार करून प्रोत्साहन देत आहेत.
नेरूरची ही सोंगे लहान मुलांना तर पर्वणीच ठरली आहेत. बाजारपेठ, मंदिर तसेच आग्रहाखातर लोकांच्या घरी जाऊन करमणूक करीत असतात. अगदी २-३ दिवसांपूर्वीच एक अंध लोकांचा ग्रुप येऊन गाणे म्हणत शबय मागत असल्याचे निदर्शनास आले. खेदाची गोष्ट म्हणजे, पूर्वीप्रमाणे गॅसबत्तीच्या उजेडात नृत्य करणाऱ्या ‘राधे’चे दर्शन मात्र दुर्मीळ झाल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)
धुळवडीने २0 मार्चला होणार सांगता
पंचक्रोशीतील लोकांना, अंध, अपंगांना आपली कला सादर करण्याची संधी देणारा वेंगुर्लेच्या या शिमगोत्सवाची सांगता २० मार्च रोजी धुळवडीच्या कार्यक्रमाने होणार आहे. पूर्वस मंदिर येथे रात्री परंपरेनुसार वाड्याची रोंबाटे एकत्र येऊन धूळ मारल्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालून उत्सवाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी सध्या प्रत्येक भागात रोंबटाचे कार्यक्रम होत आहेत.