दोन वर्षांनी येरडवमध्ये साजरा होणार शिमगोत्सव
By Admin | Published: March 10, 2015 10:40 PM2015-03-10T22:40:24+5:302015-03-11T00:13:19+5:30
वाद मिटला : तंटामुक्त समितीचे यशस्वी प्रयत्न...
मेहरून नाकाडे- रत्नागिरी -पालखीच्या मानपानावरून मानकरी व पुजारी यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे दोन वर्षे शिमगोत्सवावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासन, तंटामुक्त समिती व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन सामोपचाराने वाद मिटवल्याने राजापूर तालुक्यातील येरडव गावामध्ये श्री गांगेश्वराचा शिमगोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.
कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी परतात. शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी येत असतात. प्रत्येक गावामध्ये पालखीचे, मंदिरांचे मानकरी ठरलेले असतात. मात्र, बऱ्याच वेळा मानपानावरूनच वाद उफाळतात. त्यामुळे जिल्ह्यातील काही शिमगोत्सवावर बंदी घालण्यात आली आहे तर काही गावांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
येरडव गावातही गेली ५० वर्षे शिमगोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत असताना २०१२-१३ मध्ये मानकरी व पुजारी यांच्यामध्ये मानापानावरून वाद निर्माण झाला. वाद मिटवण्यासाठी ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले. मात्र, वाद धुमसत राहिला. परिणामी गावातील शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने शिमगोत्सवावर बंदी घातली.
शिमगोत्सव साजरा होत नसल्यामुळे गावातील अनेक मंडळी नाराज होती. परिणामी यावर्षीच्या शिमगोत्सवापूर्वीच ग्रामस्थांनी तंटामुक्त समितीकडे वाद मिटवण्यासाठी पत्र पाठवले.
तंटामुक्त समितीने पोलीस प्रशासनाचे सहाय्य घेत श्री गांगेश्वराच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलावली. त्यानंतर रायपाटण पोलीस स्थानकामध्येही बैठक झाली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी स्थानिक तंटामुक्त समितीला पुढे करून पुजारी, मानकरी, ग्रामस्थ यांचे म्हणने ऐकून घेतले व आपापसातील वाद मिटवून शिमगोत्सव साजरा करण्याची सूचना केली.
ओटवणेकर यांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे ग्रामस्थ, पुजारी, मानकरी यांनी मान्य केले. त्यामुळे श्री गांगेश्वराचा शिमगोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे.
दोन वर्षे शिमगोत्सवावर बंदी असल्यामुळे ऐन शिमगोत्सवात शांतता असायची. मात्र, तंटामुक्त समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वाद सामोपचाराने मिटवण्यात आल्याने सर्वांना शिमगोत्सवाचा आनंद मिळत आहे. गुढी पाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा करण्यात येत आहे. गावातील आबालवृध्द श्री गांगेश्वराच्या शिमगोत्सवात सहभागी झाले आहेत. दोन वर्षांनी पालखी घरोघरी येणार असल्याने ग्रामस्थांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे तंटामुक्त समिती, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
- ज्ञानदेव आनंद दळी,
मानकरी, माजी सरपंच, येरडव.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे यावर्षीच प्राप्त झाली. त्यानंतर गावातील असलेले सर्व तंटे सामोपचाराने मिटवले आहेत. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. शिमगोत्सवाचा वाद गेली दोन वर्षे असल्यामुळे तो मिटावा, अशी अपेक्षा होती. ग्रामस्थांकडून तंटामुक्त समितीकडे आलेल्या पत्रानंतर ओटवणेकर यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्यही केले. ग्रामस्थांची दोनवेळा एकत्र बैठक घेण्यात आल्यानंतर सामोपचाराने वाद मिटला. यामुळे शिमगोत्सवाचा आनंद ग्रामस्थांना प्राप्त होत आहे. गुढी पाडव्यापर्यंत शिमगोत्सव चालणार आहे. सध्या गावात चैतन्य, आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
- संजय जाधव, अध्यक्ष तंटामुक्त समिती, येरडव.
सामोपचाराने मिटवला गेला वाद.
पोलीस प्रशासन, तंटामुक्त समिती आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना आले यश.
दोन वर्षांनतर येरडवमध्ये श्री गांगेश्वराचा शिमगोत्सव पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने साजरा.
गावात चैतन्य आणि आनंदाचे वातावरण.