शिमगा काही दिवसांवर...
By admin | Published: February 20, 2015 09:25 PM2015-02-20T21:25:28+5:302015-02-20T23:15:27+5:30
कोकण नटणार : शंकासूर, खेळ्यांसह पालखीची प्रतीक्षा
कुवे : कोकणचा सर्वाधिक लोकप्रिय असा हा शिमगोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यासाठी नोकरी - धंद्यानिमित्त गावाबाहेर गेलेली मंडळी गावात आवर्जून हजेरी लावतात. या शिमगोत्सवाचे कोकणवासीयांना आता वेध लागले आहेत. फाक पंचमीला शिमग्याची सुरूवात होणार आहे.शिमगोत्सवाची तयारी सुरु झाली असून, ५ मार्चला होळी, तर ६ मार्चला धुळवडीचा सण साजरा होणार आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी ऽऽ अशा बोंबा मारायला फाक पंचमीला सुरुवात होणार आहे.होळीचा सण म्हटला की, कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण येते. कामधंद्यानिमित्त बाहेरगावी असणारी सर्व मंडळी ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या सणाला गावी येतात. त्यामुळे प्रत्येक गावाला जत्रेचे रुप येते. गावकऱ्यांमध्ये मोठा ज्वर निर्माण होतो. ग्रामदेवतेचा जयजयकार करत व पारंपरिक फाका घालीत होळीची सुरुवात होते.फाक पंचमीला पहिल्या होळीची सुरुवात होते. पालखी रांजाणी जाईपर्यंत गावकऱ्यांमध्ये होळीचा ज्वर असतो. प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी शिमगे असतात. यात त्रयोदशीचे शिमगे असतात. ग्रामीण भाषेत त्याला तेरसेचे शिमगे असेही म्हटले जाते. तसेच फाल्गुन पौर्णिमेचा शिमगोत्सव व प्रतिपदेचा शिमगा असा हा शिमगोत्सव वेगवेगळ्या दिवशी कोकणात साजरा होतो. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी सजवून घरोघरी दर्शनासाठी फिरवली जाते. त्यावेळी देवतांना रुपे लावली जातात. ग्रामदेवतांच्या मूर्ती पॉलीश केल्या जातात. पालख्यांना रंगरंगोटी करुन सजवले जाते. पाडव्यापर्यंत या उत्सवाची धूम असते.यावेळी लहान मुले तोंडावर शंकासुराचे मुखवटे चढवून घरोघरी फिरत असतात. आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना, कोल्ह्याची आय कोळसं खाय माळ्यावरचे पैसे मिळतील काय? असे म्हणून पैसे वा अन्य भेट वस्तू घेतल्याशिवाय जात नाहीत. बाजारात मिळणारे शंकासुराचे मुखवटे लावून घरोघरी फिरणाऱ्या बालगोपाळांचीही शिमगोत्सव जोशात सुरु असतो. या उत्सवात खास आकर्षक असणाऱ्या शिमग्याचे पालख्या, शंकासूर व गोमूचा नाच अशी बालगोपाळांची एक वेगळीच रंगत या उत्सवात दिसते. या शिमगोत्सवाची धूम आता सुरु होणार आहे. होळीला पोळीचा गोडा सण, तर धुळवडीला मटण - वड्याचा तिखटा सण साजरा होणार आहे. त्यामुळे या सणाची सर्वत्र उत्सुकता दिसत आहे. या सणासाठी ठिकठिकाणाहून गावकरी येत असतात. (वार्ताहर)