महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा प्रयोग जनतेला आवडला: शाहाजी पाटील
By अनंत खं.जाधव | Published: October 15, 2022 07:47 PM2022-10-15T19:47:04+5:302022-10-15T19:48:23+5:30
शरद पवार काय, देवाला सोडून मी कोणाला घाबरत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी : 1995 मध्ये तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी सध्या मला महाराष्ट्र भर फिरताना मिळत आहे.ही सर्व देवाची देणगी असून कोकणातील डोंगर ही लय भारी असल्याचे आमदार शाहाजी पाटील म्हणाले. मी कोकणातील गाव आणि गाव फिरलो असल्याने मला कोकण नवा नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही केलेला नवा प्रयोग जनतेला आवडल्याचेही स्पष्ट केले.आमदार पाटील हे कुडाळ येथील कार्यक्रमाला जाताना काही काळ सावंतवाडीत थांबले असता माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी संजू परब,अनारोजीन लोबो,उद्योगपती बापूसाहेब रूपानवर,अजय गोंदावले,राजू बेग अमित परब, दिलीप भालेकर आदि उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण कोकण शी माझे वेगळे नाते आहे. मी 1985 च्या दरम्यान निरिक्षक म्हणून आलो होतो असे ही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकारणात जो बदल झाला तो अपेक्षित होता.काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मंडळी मतदारसंघात काम करायला देत नव्हती.पराभूत उमेदवारास मोठ्याप्रमाणात निधी देत होते अर्थमंत्री अजित पवार हे सर्व घडवून आणत होते.त्याचा प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने शिवसेना अडचणीत होती.त्यामुळेच आम्हाला असा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.पण आता हा निर्णय जनतेने स्वीकारला आहे.असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
मला जी काय झाडी काय डोंगार या वाक्याने प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी यापूर्वी कधी ही मिळाली नव्हती मी 1995 साली तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर मला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी जायट किलर ही उपाधी दिली होती तेव्हाही मला जनतेने डोक्यावर घेतले होते पण आता एवढी प्रसिद्धी केव्हाच मिळाली नव्हती असे पाटील यावेळी म्हणाले.
आपण राजकारणात शरद पवार यांना घाबरता का असे विचारता त्यांनी कशाला कोणाला घाबरू असे म्हणत देवाला सोडून मी कोणाला घाबरत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच अंधेरी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे ही यावेळी आमदार पाटील म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"