खेडमध्ये मनसे विरूध्द शिवसेना अशीच लढत

By Admin | Published: November 11, 2016 12:02 AM2016-11-11T00:02:38+5:302016-11-10T23:58:53+5:30

राजकीय भवितव्य अवलंबून : योगेश कदमांची चाल निर्णायक ठरणार?

Shiv Sena against MNS in the Khed has also fought similarly | खेडमध्ये मनसे विरूध्द शिवसेना अशीच लढत

खेडमध्ये मनसे विरूध्द शिवसेना अशीच लढत

googlenewsNext

श्रीकांत चाळके -- खेड खेड नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये उमेदवारांची भ्रमंती सुरू असली तरीही नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी याच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबरोबरच आपलाही प्रचार सुरू केला आहे. या निवडणुकीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, काँग्रेस अशी पंचरगी लढत दिसून येत असली मुख्य लढत शिवसेना आणि मनसे यांच्यामध्येच होईल, असे सध्याचे चित्र आहे. खेडमधील शिवसेनेचे अस्तित्व पाहता शिवसेनेची लढत राष्ट्रवादीशी नसून ती मनसेशी आहे. त्यामुळे कदम विरूध्द कदम असा हा सामना नसून शिवसेना विरूध्द मनसे असाच आहे. एकूणच या लढतीदरम्यान योगेश कदम यांची व्यूहरचना निर्णायक ठरणार का, याकडे लक्ष आहे.
खेड नगर परिषदेत रामदास कदम यांच्या नेतृत्त्वाखाली सलग १५ वर्षे सेनेचे वर्चस्व होते. तत्कालीन जिल्हाप्रमुख किशोर कानडे यांनी याकामी विशेष मेहनत घेतली. गेल्या १० वर्षांत शिवसेनेला निसटता पराभव पत्करावा लागला. सत्ता इतर पक्षांची असली तरीही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. रामदास कदम खेडमध्ये नसतानाही खेडचे नागेश तोडकरी, बिपीन पाटणे, अरविंद तोडकरी, अरविंद चिखले आणि संजय मोदी यांच्यासारखे दिग्गज पदाधिकारी निवडणुकीची रणनीती आखत आहेत. आताच्या निवडणुकीत स्वत: रामदास कदम खेडमध्ये नसले तरीही त्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची खेडमधील ही मंडळी निवडणुकीचे काम सांभाळत आहेत. त्यांना युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांची साथ मिळत आहे.
राजकारण आणि निवडणुकीतील अनुभव कमी असला तरी योगेश कदम यांच्याकडे खेड नगर परिषदेच्या निवडणुकीची सारी सुत्र सोपवण्यात आली आहेत. योगेश कदमांनी आतापर्यंत खेड शहरातील विकास आणि निवडणूक पध्दतीबाबत माहिती घेतली. निवडणुकीत युवा सेनेची मोठी फळी उतरली आहे. शिवसेनेची यापूर्वीची धोरणे आणि आता राबवायची धोरणे, याबाबत दररोज आढावा घेऊन त्यानुसार रणनीती आखली जात आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते काम करीत आहेत. परिस्थितीनुसार प्रचाराची पध्दत आणि दिशा बदलली जात आहे.
संजय कदम आमदार झाल्यापासून त्यांनी शहर विकासासाठी काही केले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मनसेचे वैभव खेडेकर यांना हाताशी धरून त्यांनी नवी खेळी खेळली आहे. आपल्या कामाने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही भुरळ घातली आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यासह त्यांनी मनसेच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य केले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी अखेरच्या वर्षामध्ये केलेली विकासकामे नागरिकांच्या लक्षात आहेत. मात्र, सत्ता असताना काही प्रश्न आजही अधांतरी आहेत. नागरिकांच्या गरजेचे मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था, कचरा डेपो, सांडपाण्याची व्यवस्था आणि बंदिस्त गटारे योजना याबरोबरच अनधिकृत बांधकामे या समस्या आजही प्रलंबित आहेत. शहरवासीयांच्या विविध समस्या आणि प्रश्न आजही महत्त्वाचे आहेत. मात्र, अशा प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.
मात्र, या तुलनेत राष्ट्रवादीचे शहर विकासासाठी योगदान ते कसले? असा प्रतिप्रश्न नागरिक करीत आहेत. आमदार संजय कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मनसेच्या साथीने उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. खेडमध्ये मनसेची ताकद चांगली असल्याने नगर परिषदेत शिरकाव करण्यासाठी राष्ट्रवादीची ही खेळी आहे. मात्र, त्याला किती यश मिळेल, हे निकालानंतरच कळणार आहे. राष्ट्रवादीला फारसे यश मिळणार नसल्याचे सांगितले जात असले तरी संजय कदम कोणता चमत्कार करतात, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
या स्थितीत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसशी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून युती करण्याचा घेतलेला निर्णय खेडमधील नागरिकांच्या आणि मतदारांच्या कितपत पचनी पडेल, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Shiv Sena against MNS in the Khed has also fought similarly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.