आगामी लोकसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी केली 'यांची' नियुक्ती
By सुधीर राणे | Published: March 2, 2023 04:37 PM2023-03-02T16:37:48+5:302023-03-02T16:51:34+5:30
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
कणकवली: शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुखपदी आमदार रविंद्र फाटक यांची निवड करण्यात आली. शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाटक यांची नियुक्ती केली.
दरम्यान, कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केले जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणात सर्वांगीण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांनी व्यक्त केली.
आमदार फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करीत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केले आहे. त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी पक्षाच्यावतीने त्यांच्यावर संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रवींद्र फाटक यांनी २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क असल्याने आगामी काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे.
आमदार फाटक यांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश सावंत -पटेल, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, सरपंच संघटना दोडामार्ग प्रमुख प्रवीण गवस यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.