Maharashtra Election: तळकोकणात बंडखोरीचे वारे; दिपक केसरकर, नितेश राणेंविरोधात भाजपाचे नेतेच मैदानात

By हेमंत बावकर | Published: October 3, 2019 01:22 PM2019-10-03T13:22:42+5:302019-10-03T14:04:42+5:30

माजी आमदार नितेश राणे यांना भाजपाने प्रवेश दिल्याने सिंधुदूर्गचे राजकारणच बदलून गेले आहे.

Shiv sena-BJP alliance in trouble at Sindhudurg; Deepak Kesarkar, Nitesh Rane got challenge from Bjp Leaders | Maharashtra Election: तळकोकणात बंडखोरीचे वारे; दिपक केसरकर, नितेश राणेंविरोधात भाजपाचे नेतेच मैदानात

Maharashtra Election: तळकोकणात बंडखोरीचे वारे; दिपक केसरकर, नितेश राणेंविरोधात भाजपाचे नेतेच मैदानात

Next

- हेमंत बावकर

मुंबई/कणकवली : युतीसाठी राज्य सभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अनेकदा लांबणीवर टाकण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार नितेश राणे यांना भाजपाने प्रवेश दिल्याने सिंधुदूर्गचे राजकारणच बदलून गेले आहे. तर गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याविरोधातही भाजपाच्या नेत्याने बंडखोरी केल्याने सिंधुदुर्गमध्ये तरी युती नसल्याचे वातावरण आहे. 

वेंगुर्ला- सावंतवाडी
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा वेगवेगळी लढली होती. यावेळी मालवण-कुडाळ मतदारसंघातून दिग्गज नेते नारायण राणे यांना पराभव पहावा लागला होता. तर त्यांची साथ सोडून भाजपात गेलेले राजन तेली हे सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघातून केसरकरांविरोधात लढले होते. मात्र, ही जागा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. तेली यांनी आज सावंतवाडीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. ते केसरकरांविरोधात अपक्ष उभे राहणार आहेत. 

कणकवली- देवगड

दुसरीकडे माजी आमदार नितेश राणे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्याविरोधातही भाजपातूनच बंडखोरीचे निशान फडकाविण्यात आले आहे. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी आज कणकवलीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरला. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संदेश पारकर काँग्रेसमध्ये नितेश राणे यांच्या सोबत होते. त्यांचा प्रचारही केला होता. पारकर आणि राणे वाद खूप मोठा होता. 15 वर्षांपूर्वीचे सत्यविजय भिसे खून प्रकरणावरून त्यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र, राजकारणात काही कायम नसते या उक्तीप्रमाणे पारकर नारायण राणेंच्या जवळ गेले होते. यासाठी कणकवली नगरपरिषदेचे राजकारणही कारणीभूत होते. पारकर यांनी नितेश राणे यांना प्रचारासाठी मदत केली होती. मात्र, राणे आमदार होताच काही काळातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नितेश राणे यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता. तर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राणेंना पाठिंबा होता. 

तर दुसरीकडे नितेश राणे यांच्यावर आरोप करत नारायण राणेंपासून फारकत घेतलेले शिलेदार सतीश सावंत हे देखील नितेश राणे यांच्या विरोधात अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे. सावंत मातोश्रीवर गेले असून आज संध्याकाळ पर्यंत शिवसेनेचा एबी फॉर्म मिळतो की शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले जाते, हे स्पष्ट होणार आहे. नितेश राणे यांना एकेकाळच्या दोन स्वकीयांकडूनच आव्हान मिळणार आहे. 

 
मालवण-कुडाळातही बंडखोरी?
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे राज्यभराचे लक्ष असलेला कुडाळ-मालवण मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. गेल्या निवडणुकीत नारायण राणेंविरोधात वैभव नाईक यांनी लढा दिला होता. राणे आणि नाईक हे दोघेही कणकवलीचे रहिवासी आहेत. मात्र, 2009 च्या निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला होता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाईक यांनी राणे यांचा तब्बल 10 हजार मतांनी पराभव केल्याने साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नारायण राणेंचे उजवा हात समजले जाणारे दत्ता सामंत अपक्ष लढणार आहेत. नितेश राणे भाजपात आणि त्यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या आमदाराविरोधात असल्याने इथेही बंडखोरीच झाली आहे.

...अन् नितेश राणे रडले होते
एरव्ही सडेतोड स्वभावाच्या नितेश राणे यांचे भावनिक रूप महाराष्ट्राने पाहिले होते. बाजुच्या मतदारसंघात नारायण राणे पराभूत तर नितेश राणे 25 हजारांच्या मताधिक्याने जिंकले होते. नारायण राणे पराभवाचे दु:ख झेलून नितेश राणे यांना कणकवलीमध्ये भेटायला गेले होते. यावेळी नितेश राणे त्यांना मिठी मारून रडले होते.

नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी; अपक्ष अर्ज दाखल

नितेश राणेंचा आज भाजपा प्रवेश; कणकवलीत जल्लोष सभा

 

 

Web Title: Shiv sena-BJP alliance in trouble at Sindhudurg; Deepak Kesarkar, Nitesh Rane got challenge from Bjp Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.