भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:00 PM2021-02-11T13:00:13+5:302021-02-11T13:02:14+5:30
Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
सिंधुदुर्गनगरी : केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्यांचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणीही आहेत. त्याच दैवताचा आशीर्वाद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाभला; म्हणूनच तर ते सध्या दिसत आहेत. नाहीतर त्यांचे काय झाले असते हे मी आता सांगू शकत नाही. गोध्रा हत्याकांड प्रकरणात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणूनच ते वाचले, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.
निवडणूक प्रचारात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत, असे भाजप सांगत होते. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत असे शहा यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, निवडणूक प्रचाराची वेळ एकमेकांना सांभाळून घ्यायची वेळ असते. त्यावेळी भांडायचे नसते. ही निवडणूक शिवसेना-भाजप असे आम्ही एकत्र लढत होतो; त्यामुळे त्यावेळी काही बोललो नाही.
आम्ही फसवले नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे भाजपने कृतघ्नता दाखवायला सुरुवात केली; त्यामुळे भाजपला शहाणपण शिकवणे गरजेचे होते. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या पाठीमागून किती वेळा आरत्या फिरवत फिरायचे असा प्रश्न यावेळी खासदार राऊत यांनी करतानाच युती मोडल्याचे दुःख आम्हांला बिलकुल नाही. मात्र, ही युती तोडण्यास भाजप आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आदी कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिको
राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली आहे. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची, हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्यापाठी ह्यईडीह्ण लावायची, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.