शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:57 AM2020-02-18T10:57:05+5:302020-02-18T11:15:55+5:30
पत्रकारांनी सामनातून छापून आलेल्या जाहिरातीसंदर्भात विचारले असता, उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे.
ओरोसः सामनातील नाणारसंदर्भातील जाहिरातीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर शिवसेनेनं नाणारवरून यू-टर्न घेतल्याची चर्चा कोकणात सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांनी सामनातून छापून आलेल्या जाहिरातीसंदर्भात विचारले असता, उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. शिवसेनेचं धोरण आणि निर्णय मी ठरवतो आणि ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार सेनेची भूमिका ठरवत नाही. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली, असं होत नाही. अशा वेगवेगळ्या जाहिराती रोज येतात, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओरोस येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक झाली. आरोग्य, रस्ते, शेती, स्थानिक शेतकऱ्यांचे मुद्दे समोर आलेत. शक्य तितक्या मुद्द्यांवर तात्काळ मदतीचे आदेश दिलेत. सर्व स्थानिक मुद्द मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सिंधुरत्न विकास योजना आखली आहे. आमदारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. एलईडी मासेमारी रोखण्यासाठी कायदा करणार आहे, असेही उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आहेत. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, संदेश पारकर उपस्थित होते.
नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले
तत्पूर्वी नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे 20 हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासीयांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं सामनातून छापून आलेल्या जाहिरातीत केला होता. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. भाजपासोबत सत्तेत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारविरोधात भूमिका घेतली होती. मात्र आता सत्तेत येताच शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्याच पानावर नाणारची जाहिरात आल्यानं कोकणात शिवसेनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
नाणार शिवसेनेला चालणार? सामनाच्या पहिल्या पानावर प्रकल्पाची जाहिरात; कोकणात संभ्रम