शिवसेनेकडे विकासाची दूरदृष्टी नाही -: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:49 PM2019-10-11T23:49:32+5:302019-10-11T23:51:52+5:30

काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

The Shiv Sena has no vision for development | शिवसेनेकडे विकासाची दूरदृष्टी नाही -: नारायण राणे

कुडाळ मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाजूला प्रमोद जठार, दत्ता सामंत आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देभाजप-स्वाभिमानचा कार्यकर्ता मेळावा, भाजप मजबुतीसाठी काम करा

कुडाळ : गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी जिल्ह्यात विकासात्मक काहीच काम केले नाही. त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. नाईक यांना बोलता येत नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथील संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली. काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजप व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे संयुक्त कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उमेदवार रणजित देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर, संग्राम देसाई, राजू राऊळ, अंकुश जाधव, प्रभाकर सावंत, भाई सावंत, निलेश तेंडुलकर, संध्या तेरसे, विवेक मांडकुलकर, दादा साहिल, राकेश कांदे, विनायक राणे, विकास कुडाळकर, बंड्या सावंत, राजा प्रभू, प्रशांत राणे, चारुदत्त देसाई, दादा बेळणेकर, आनंद शिरवलकर, योगेश बेळणेकर, प्रशांत राणे, दीपक नारकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. मात्र शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात एकही प्रकल्प, विकास काम आणले नाही. विमानतळ सुरू नाही, रेडी बंदर पूर्ण नाही, अनेक प्रकल्प बंदावस्थेत आहेत. त्यांनी विकास केलाच नाही. त्यामुळे विकासाच्याबाबत बोलूच शकत नाहीत, असा टोला राणे यांनी केसरकर, राऊत व नाईक यांना लगावला. मी जनतेचा सेवक आहे. पदासाठी काम करीत नाही तर पदे आपल्यापर्यंत येतात, असे त्यांनी सांगितले. पदाधिकारी, कार्यकर्ता हा दत्ता सामंत यांच्यासारखा असला पाहिजे. त्यांच्याकडे प्रामाणिकता आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आले. स्वत:च्या खिशात हात घालून खर्च करण्याची त्यांची दानत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक उमेदवारी अर्ज दाखल करायला येतात, हे त्यांनी गेल्या २५ ते ३0 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा योग्य मानसन्मान केला जाईल. मात्र आम्हाला सोडून गेलेल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. त्यांची भविष्यात अवस्था बिकट आहे, असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.


मी एका दिवसात आमदार झालो : सामंत
यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी सांगितले की, मी उमेदवार म्हणून इच्छुक नव्हतो. सतीश सावंत इच्छुक होते. त्यांनाच उमेदवारी मिळणार होती. मात्र कोणालाच काही न सांगता निघून गेले. लढ म्हणणारा शिवसेनेचा वाघ कोल्हा झाला. रणांगणात न लढता आमदार नाईक पळकुटे निघाले. व मी एका दिवसात आमदार झाल्यासारखे वाटले. सत्तेसाठी शिवसेनेच्या कुबड्याची गरज लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतुल काळसेकर यांनीही आपले विचार मांडले.
 

भाजप हाऊसफुल
यावेळी बोलताना प्रमोद जठार यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्यामुळे भाजपात मेघा भरती होऊन पक्ष हायजॅक नाही तर हाऊस फुल्ल झाला आहे. सिंधुदुर्गातील भाजपचा आता वनवास संपला आहे. नारायण राणे यांनीच शिवसेना वाढवली, व तेच खरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व शिवसेनेचे खरे वारसदार आहेत, असे त्यांनी सांगितले.


 

Web Title: The Shiv Sena has no vision for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.