बाळासाहेबांच्या विचारांनीच घराघरांत शिवसेना
By admin | Published: July 15, 2016 10:26 PM2016-07-15T22:26:42+5:302016-07-15T22:35:36+5:30
वैभव नाईक : वेंगुर्लेत शिवबंधनचा समारोप; लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा
वेंगुर्ले : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विशिष्ट ध्येयधोरणांनी शिवसेनेची स्थापना केली. सामान्यांच्या सर्वांगीण विकासाचा वसा घेतल्यानेच राज्यातील घराघरांत भगवा फडकत आहे. आगामी निवडणुकीतही त्याच जोमाने कार्यकर्त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करावी, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात शिवबंधन पंधरवडा मेळाव्याचे आठही तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांचा वेंगुर्ले तालुक्यातील समारोप उभादांडा-सुयोग मंगल कार्यालय येथे उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघात ५० वा मेळावा घेऊन करण्यात आला. यावेळी नाईक बोलत होते.
या शिवबंधन मेळाव्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सावंतवाडी संपर्कप्रमुख राजू नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद नियोजन सदस्य प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, वेंगुर्ले पंचायत सभापती सूचिता वजराठकर, वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश नाईक, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, तालुका विभागप्रमुख रमेश नार्वेकर, विवेक आरोलकर, युवासेना तालुकाप्रमुख डिलीन डिसोजा, माजी उपसभापती सुनील मोरजकर, युवा सेनेचे कार्मिस आल्मेडा, रजत साळगावकर, वेंगुर्ले दक्षता समिती अध्यक्ष सचिन वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नरसुल उपस्थित होते.
नाईक म्हणाले, लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार, संकटे, समस्या सोडविण्यासाठी शिवसैनिकानी कटीबद्ध राहवे. बाळासाहेबांच्या विचारांनी अभिप्रेत शिवसैनिक तयार करण्यासाठी याची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवावी. दोन वर्षात पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पर्यटन, महामार्ग, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यासाठी कोट्यवधीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. महिलांना रोजगार देण्याच्या उद्देशाने कुडाळ एमआयडीसी येथे काथ्या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अजित सावंत, सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत, राजू नाईक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी पन्नास ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत युवा सेनेचे दिगंबर नरसुले, तर सूत्रसंचालन एकता महिला मंच सदस्य अनुश्री कांबळी यांनी केले. यावेळी उभादांडा वेंगुर्ले परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)