सर्किट बेंचसाठी शिवसेना आग्रही

By admin | Published: August 24, 2016 10:15 PM2016-08-24T22:15:56+5:302016-08-24T23:46:59+5:30

उद्धव ठाकरे : खंडपीठ कृती समितीने घेतली मुंबईत भेट

Shiv Sena insists for circuit benches | सर्किट बेंचसाठी शिवसेना आग्रही

सर्किट बेंचसाठी शिवसेना आग्रही

Next

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने दहीहंडीबाबत निर्णय घेण्याऐवजी सर्किट बेंचचा प्रश्न निकाली काढला असता तर बरे झाले असते. हा प्रश्न समाजाचा आहे, स्वस्थ बसू नका, असा खंडपीठ कृती समितीला सल्ला देत कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी शिवसेना आग्रही राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून वकील करीत आहेत. चार वर्षांत आंदोलनाने चांगलीच धार घेतली आहे. याचाच भाग म्हणून यापूर्वी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणे, अशी विविध आंदोलने वकिलांनी केली. या मागणीसाठी
१९ आॅगस्ट २०१६ ला सहा जिल्ह्यांतील वकिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. खंडपीठ कृती समितीने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.
कृती समितीचे निमंत्रक
अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी आंदोलनाची माहिती देऊन मोहित शहा यांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने फक्त कोल्हापूरसाठी ठराव करावा, तसेच बजेटमध्ये खंडपीठ इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करून निवेदन दिले. त्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सर्किट बेंचसंबंधी कृती समितीची बैठक घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर फडणवीस यांनी चार दिवसांत बैठक बोलावू, असे आश्वासन दिले.
ठाकरे यांनी कृती समितीला सर्किट बेंचचा प्रश्न समाजाचा आहे; स्वस्थ बसू नका, असा सल्ला देत कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी शिवसेना आग्रही राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी मंत्री शिंदे यांना मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. खंडपीठ कृती समितीचे सदस्य व जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रशांत चिटणीस, अभिजित कापसे, रणजित गावडे, राहुल बंदोडे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव उपस्थित होते.

सर्किट बेंचविषयी खंडपीठ कृती समितीने बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेजारी उपस्थित मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अ‍ॅड. प्रकाश मोरे, विवेक घाटगे, अभिजित कापसे, प्रशांत चिटणीस, प्रसाद जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena insists for circuit benches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.