..अन् जिवंत असतानाच त्यांना दाखवलं मृत, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:57 PM2022-05-07T18:57:19+5:302022-05-07T18:58:48+5:30

मृत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केली

Shiv Sena leader and sports worker Vasant Kesarkar was shown dead alive | ..अन् जिवंत असतानाच त्यांना दाखवलं मृत, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील धक्कादायक प्रकार

..अन् जिवंत असतानाच त्यांना दाखवलं मृत, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा क्रीडाक्षेत्रात काम करणाऱ्या वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना संघटनेतून बाहेर करण्यासाठी जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील त्यांचे आजीवन सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हे पद रद्द करताना अध्यक्ष व कार्यवाहकांनी केसरकर जिवंत असतानाच त्याना मृत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे क्रीडाक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत केसरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच ते लवकरच कबड्डी फेडरेशनचे राष्ट्रीय पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेणार असून सिंधुदुर्गची कार्यकारणी तत्काळ बरखास्त करण्याची मागणी करणार आहेत.

सावंतवाडी जिमखाना येथे १९८३ साली सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व कबड्डीचा प्रसारासाठी हे फेडरेशन निर्माण झाले. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ मंडळी यात होती. पण त्यातील काहीचा मृत्यू झाल्यानंतर हे फेडरेशन युवकांच्या हाती आले. या काळात काही चुकीचे प्रकार घडले. असे असतानाही अलीकडेच या फेडरेशनची माहिती घेतली असता आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला.

चक्क फेडरेशनचे अध्यक्ष व कार्यवाहकांनी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तकांडे जमा केली. अन् त्यांचे नाव सदस्य यादीतून कमी केले. विशेष म्हणजे या कार्यकारणीला धर्मादाय आयुक्तांनी मंजूरी देऊन सिंधुदुर्ग न्यायालयाची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी केसरकर यांनी केली आहे. तसेच सावंतवाडी पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून चक्क एका राजकीय नेत्यालाच मृत दाखवण्याचे धाडस करण्यात आले असून  त्यांचे सभासदत्व ही रद्द करण्यात आले असल्याने हा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.

शेवटपर्यंत प्रकरण लावून धरणार : केसरकर

आम्ही स्थापन केलेल्या कबड्डी फेडरेशन मध्ये आम्हालाच कागदोपत्री मृत दाखवण्यात आले. हे मोठे धाडस. जिवंतपणी मृत दाखवणे हा मोठा गुन्हा असून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असे वसंत केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena leader and sports worker Vasant Kesarkar was shown dead alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.