चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकरांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:13 PM2022-08-01T15:13:33+5:302022-08-01T15:13:40+5:30
मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची सभा झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं, विनायक राऊतांनी साधला निशाणा.
सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय नाट्य रंगलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरू आहेत. यातच शिवसैनिकांना बळ देण्यासाठी अन् पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली आहे. दरम्यान, सोमवारी कोकणात होत असलेल्या या निष्ठा यात्रेत त्यांनी कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली. तसंच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आव्हान केलं. यानंतर त्यांची यात्रा बंडखोर आमदार दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात आली.
या सभेदरम्यान खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांवर टीकेचा बाण सोडला. "उद्धव ठाकरेंची सभा मागच्या वेळी झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं. शिवसेनेत आले त्यांनी आधार दिला. त्यांना मदत केली म्हणून उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक, राजन साळवींसारखा कार्यकर्ता असतानाही केसरकरांना मंत्रिपद दिलं, लाड पुरवले. परंतु या पवित्र भूमीत असे गद्दार निर्माण झाले हे दुर्देव आहे," असं म्हणत राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
"चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत. हिंदुत्वावर आता हे पोपट बोलायला लागले. ज्या सावंतवाडीकरांनी बोट पकडून राजकारणात आणलं त्या दिलीप नार्वेकरांना फेकून दिलं. शरद पवारांनी त्यांना आधार दिला त्यांच्या तोंडालाही केसरकरांनी पानं पुसली. ज्या शरद पवारांवर आरोप केले त्यांच्याबद्दल शब्द तोंडातून निघतात कसे?," असा सवालही त्यांनी केला. "ज्या पद्धतीनं तुम्हाला उभं केलं, मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेला, परंतु आईवडिलांची शपथ घेऊन सांगा, तुम्ही गद्दारी केली तुम्हाला शिवसेनेचं नाव घेण्याचा अधिकार नाही," असंही ते म्हणाले. आम्हाला संजय राऊतांचा अभिमान असून शिवसेनेचा नेता असावा तो संजय राऊतांसारखाच असं वक्तव्यही त्यांनी केलं.