रिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 08:04 PM2021-06-25T20:04:45+5:302021-06-25T20:10:38+5:30
nanar refinery project Pramod Jathar Sindhudurg : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
कणकवली : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिक माहिती देताना प्रमोद जठार म्हणाले, नाणारमधील प्रस्तावित असलेल्या १४ गावांतील तब्बल साडेआठ हजार एकरांचे जमीन मालक शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असताना जाहीर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने नाणारमधून काढता पाय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला कडवा विरोध केला होता.
अकरा हजार एकरात एकही गाव, वाडीचे विस्थापन नाही
आता नाणारनंतर राजापूर तालुक्यातील शहरानजीकच्या बारसू व सोलगाव या ठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनी चाचपणी करत आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू, सोलगाव वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढली आहे. तर त्या परिसरातील ११ हजार ५०० एकर जमीन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या साडेअकरा हजार एकरात एकही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे.
जनताच हद्दपार करेल
या भागातील बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजून तरी याठिकाणी विरोधाची भूमिका कोणी घेतली नाही, मात्र पुन्हा नाणारची री ओढली गेल्यास रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तसे झाल्यास कोकणच्या राजकारणातून खासदार राऊत आणि आमदार साळवी यांना जनताच हद्दपार करेल, असा दावा प्रमोद जठार यांनी केला आहे.