कामे मार्गी लागत असल्याने राणेंना 'पोटशूळ' उठला: विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:10 AM2020-02-20T10:10:05+5:302020-02-20T10:10:56+5:30
आम्ही करीत असलेल्या कामांबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे विरोधासाठी विरोध करीत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला.
सिंधुदुर्ग ( कणकवली ): सिंधुदुर्गातील लघुसिंचन प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प, मच्छिमार कर्जमाफी, मच्छिमार डिझेल परतावा, चक्राकार पद्धतीने रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील घरांना ग्रामपंचायतीकडे परवानगी, एलईडी मच्छिमारीवर बंदी व अन्य विकासकामांचा आढावा घेत काही महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतले. मात्र, आम्ही करीत असलेल्या कामांबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे विरोधासाठी विरोध करीत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. कणकवली येथील विजय भवनमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विनायक राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागवार जाऊन बैठका घेत तेथील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एक नवा पायंडा महाराष्ट्रात घातला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला, त्यांच्यासोबत विविध खात्यांचे १० प्रधान सचिव व मंत्री उपस्थित होते. रत्नागिरी जिल्यातील गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, असल्याचे राऊत म्हणाले.
तर आंगणेवाडी येथील २००३ पासून रखडलेल्या लघुसिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली. त्यानुसार २३ कोटींच्या तलावाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी केला. या तलावातून मसुरे, देऊळवाडा नळयोजना होणार आहे.३ महिन्यांच्या आत मुख्यमंत्री जिल्ह्यात येऊन विविध विकासकामांचा आढावा घेत आहेत. मात्र त्यांचे स्वागत न करता नारायण राणेंनी स्वत:चे तुणतुणे विरोध करून वाजविले आहे.
राणेंच्या कारकिर्दीत न झालेली कामे आता मार्गी लागत असल्याने त्यांना 'पोटशूळ' उठला आहे. चिपी विमानतळाचे राणेंच्या काळात फक्त ११ टक्के काम झाले होते. राणेंमुळेच हे विमानतळ खासगी विकासकाला देण्यात आले. जर ते सरकारचे असते तर आता पूर्ण झाले असते, असा घणाघाती आरोप विनायक राऊत यांनी केला.