Narayan Rane: संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:26 AM2021-08-29T11:26:58+5:302021-08-29T11:28:56+5:30
Narayan Rane: संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे.
Narayan Rane: संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. माझ्या मुलांची बरोबरी त्यांनी करू नये. नाहीतर मलाही 'सामना'तल्या लिखाणावर 'प्रहार' मधून उत्तर द्यावं लागेल, असा घणाघात केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. ते आज कणकवलीत जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'सामना'च्या 'रोखठोक'मधून संजय राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश आणि नितेश यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राणे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. "माझ्या मुलांवर टीका करण्याआधी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही 'प्रहार'मधून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल", असं नारायण राणे म्हणाले.
संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोला
तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले.
जनआशीर्वाद यात्रेत 'मांजर' आडवी गेली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचं पालन करत आम्ही जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी लोक सहा-सात तास उभं राहून यात्रेला प्रतिसाद देतायत. पण यात्रेत काही अपशकून देखील झाले. 'मांजर' आडवी गेली. पण मी काही त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. यात्रा आजही मोठ्या उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात सुरू आहे, असं राणे म्हणाले.