शिवसेनेच्या पोस्टरवर कोकणऐवजी आयर्लंडचा रस्ता, विनायक राऊतांनी 'छापून दाखवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 01:23 PM2019-04-10T13:23:39+5:302019-04-10T13:25:51+5:30
शिवसेना-भाजप-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून लोकसभेच्या रिंगणात आहेत.
मुंबई - निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यामध्ये आपण केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला जातो. शिवसेना नेते आणि महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी वापरलेल्या जाहिरातीवर कोकणच्या विकासाचा म्हणून चक्क आयर्लंडमधील फोटो छापल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करुन दाखवलं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या विनायक राऊतांनी आता छापून दाखवलं असं म्हणता येईल.
शिवसेना-भाजप-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून लोकसभेच्या रिंगणात आहेत. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून पोस्टर्स छापण्यात आली आहेत. त्या पोस्टर्सवर प्रगत कोकण शांत कोकण अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. मात्र, या टॅगलाईनसोबत देण्यात आलेला फोटो हा कोकणातील रस्त्यांचा नसून आयर्लंडमधील असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे विकासाच्या नावावर शिवसेना नेत्याकडूनही खोटंनाटं छापण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
विनायक राऊत हे 2014 च्या निवडणुकामध्ये निवडून आले होते. त्यावेळी नारायण राणे पुत्र आणि तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांचा पराभव करून ते लोकसभेत पोहोचले होते. त्यामुळे शिवसेनेने यंदाही विनायक राऊत यांना तिकीट देऊन लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. तर विनायक राऊत हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महायुतीच्या जाहीर सभेत म्हटले होते. दरम्यान, विनायक राऊत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात असून काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदीवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक प्रचार करण्यात येतो. तसेच खोट्या बातम्याही पसरवल्या जातात. मात्र, आता चक्क उमेदवारांकडूनही खोटा निवडणूक जिंकण्यासाठी खोटा प्रचार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कोकणचा रस्ता म्हणून चक्क विदेशातील रस्ता राऊत यांच्या प्रचारार्थ छापलेल्या पोस्टर्संवर दाखविण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून शिवसेनेची खिल्ली उडविण्यात येत आहे. भाजापासोबतच जाऊन शिवसेनेलाही, वाण नाही पण गुण लागला, असे म्हणत हा फोटो व्हायरल होत आहे.
संबंधित फोटो 'हा' आयर्लंडचाच असल्याची खात्री, क्लीक करा..
https://commons.wikimedia.org/wiki/File:N11_dual-carriageway_median_barrier.jpg