मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार
By admin | Published: May 24, 2017 11:21 PM2017-05-24T23:21:16+5:302017-05-24T23:21:16+5:30
मुदतपूर्व निवडणुकीला शिवसेना केव्हाही तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : राज्यात केव्हाही मुदतपूर्व निवडणूक लागल्यास शिवसेना लढण्यास तयार आहे, असे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे सांगितले. सत्ताधारी पक्षाचे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता असल्याचे विधान केले होते. यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
येथील पर्णकुटी विश्रामगृहावर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवा नेते विक्रांत सावंत, अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कामगारांचा रखडलेला तीन महिन्यांचा पगार संंबंधित ठेकेदाराने न दिल्यास तो बीएसएनएलने द्यावा. या प्रकरणात नेमका दोषी कोण, याबाबत वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, कामगारांचा विचार करता त्यांना पगार मिळावा, यासाठी तो कंपनीने द्यावा, असे राऊत म्हणाले.
जिल्ह्यात विकासकामांची खोटी बिले तयार करणे, अधिकाऱ्यांची नको त्या व्यक्तीशी हातमिळवणी असणे हा प्रकार यापुढे शंभर टक्के बंद होणार आहे. तसेच राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या सर्व कामांच्या आराखड्याच्या चौकशीची मागणी
करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासन आपले नोकर असता कामा नये. शिवाय प्रशासनाची उदासिनता लोकांच्या विकासाच्या आड येत असल्यास त्यावर गदा आणण्याचे काम शिवसेना येत्या काळात करणार आहे. राज्यात मुदतपूर्ण निवडणुका केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केले होते. याबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, असे त्यांना विचारले असता शिवसेना केव्हाही निवडणुका झाल्यास तयार आहे. त्यादृष्टीने आपण तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ दौरा केला आहे. येत्या ३० जूनला एक दिवसाचा कोकण दौरा पक्षप्रमुख करणार असून, शिवसंपर्क अभियानालाही सुरुवात झाली असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. मात्र, निवडणुका स्वबळावर का युती करणार? याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
तर त्यांचे बापही ‘जय महाराष्ट्र’ बोलतील...
जय महाराष्ट्र बोलल्यास राजकीय पद रद्द होईल, असे वक्तव्य करणारा रोशन बेग म्हणजे बिनडोक्याचा माणूस आहे.
कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर जाणूनबूजून भेदभाव केला जात आहे.
याबाबत तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा बेगच काय त्याच्या बापालाही जय महाराष्ट्र म्हणावयास लावू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.