शिवसेनेने ग्रीन रिफायनरीला का विरोध केला याचे उत्तर द्यावे!, भाजप नेत्याचा सवाल
By सुधीर राणे | Published: September 16, 2022 03:44 PM2022-09-16T15:44:35+5:302022-09-16T15:45:45+5:30
केवळ राजकीय फायद्यासाठी सी वर्ल्ड नाकारून युवकांच्या हातातील रोजगार हिरावून घेणारी शिवसेना आता सी वर्ल्ड बाबत सह्यांची मोहीम राबविणार काय?
कणकवली : वेदांता - फॉक्सकॉनवर राज्यात मागील चार दिवस आरोप प्रत्यारोप करून वातावरण बिघडवण्याचे काम विरोधक करत आहेत. या कंपनीच्या संबंधात यापूर्वी राज्य सरकारचे कोणते करार झाले होते काय ? शिवसेनेने सिंधुदुर्गात सरकारविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मग रोजगार निर्माण करणाऱ्या व ३ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या ग्रीन रिफायनरीला शिवसेनेने का विरोध केला? असा सवाल करतानाच त्या प्रकल्पाविषयी सह्यांची मोहीम शिवसेना राबविणार का? याचे उत्तर जनतेला त्यांनी द्यावे. असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी लगावला आहे. कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तेली म्हणाले, विजयदुर्ग ते कोल्हापूर सहापदरी महामार्ग होणार होता. वैभववाडीला रेल्वे जंक्शन होणार होते, बहुतांश जमीनमालक ग्रीन रिफायनरीला जमीन देत सहकार्य करत आहेत. लाखोंचा रोजगार देणाऱ्या आणि कोकण आर्थिक संपन्न बनवणाऱ्या ग्रीन रिफायनरीला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विरोध का केला?
ग्रीन रिफायनरीला विरोध करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह कोकणातील लाखो युवक, युवतीना रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला. जसे वेदांत - फॉक्सकॉनवरून सह्यांची मोहीम राबवित आहेत तशीच मोहिम त्या प्रकल्पाच्या बाबतीतही शिवसेना घेणार काय? आशिया खंडातील एकमेव सी- वर्ल्ड प्रकल्पाला शिवसेना आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी विरोध करून जनमत दूषित केले. लाखोंचा रोजगार देणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्पात कोणते पर्यावरणहानी करणारे दुष्परिणाम होते? केवळ राजकीय फायद्यासाठी सी वर्ल्ड नाकारून युवकांच्या हातातील रोजगार हिरावून घेणारी शिवसेना आता सी वर्ल्ड बाबत सह्यांची मोहीम राबविणार काय? असाही सवाल तेली यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ताज ग्रुप शेकडो कोटींची गुंतवणूक करून तारांकित हॉटेल सुरू करणार होते. त्यालाही शिवसेनेने विरोध केला. सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिक युवक, युवती आज घडीला गोव्यात नोकरी करतात. या सर्वांना सी वर्ल्ड, ग्रीन रिफायनरी, तारांकित हॉटेल मुळे नोकरी मिळाली असती.या सर्वांचा रोजगार शिवसेनेने हिरावून घेतला असा आरोपही राजन तेली यांनी यावेळी केला.
शिंदे गटाशी कितीजणांचा संपर्क?
केंद्रीयमंत्री राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून जिल्ह्यात फिरून दाखवावे असे म्हणणाऱ्या गौरीशंकर खोत यांनी जीभ सांभाळून बोलावे असा सूचक इशारा राजन तेली यांनी दिला. खोत यांच्यासोबत बसणारे सगळे केंद्रीयमंत्री राणेंच्या नजरेला नजर देण्याचीही हिम्मत करत नाहीत. खोत यांच्या आजूबाजूला बसणारे कितीजण शिंदेगटाशी संपर्क ठेवून आहेत याचाही अभ्यास करावा असा टोलाही राजन तेली यांनी यावेळी लगावला.