दोडामार्गात शिवसेनेने केला टँकरने पाणीपुरवठा, प्रशासनाविरोधात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:44 AM2019-06-03T11:44:33+5:302019-06-03T11:46:05+5:30
दोडामार्ग तालुक्यात भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात शिवसेनेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या भागातील जनतेला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रशासनाच्या विरोधात नारळ वाढवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
दोडामार्ग : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात शिवसेनेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या भागातील जनतेला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रशासनाच्या विरोधात नारळ वाढवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, पाणीटंचाईबाबत पंचायत समितीतर्फे चार महिन्यांपूर्वी टंचाई आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याला मंजुरी मिळाली. पण पुढील कोणतीही पूर्तता प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे शिवसेनेने नैतिक जबाबदारी स्वीकारून तालुक्यात पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आज श्रीफळ वाढवून याची सुरुवात करीत असून, याची गंभीर दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात असंतोष वाढेल, याची दखल घ्यावी. तसेच मंजूर बोअरवेलसाठी गाडी पाठवावी व मंजूर निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा, अशी मागणी धुरी यांनी केली.
यावेळी सभापती संजना कोरगावकर, तळेखोल सरपंच सुरेश सावंत, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, संदीप कोरगावकर, दौलत राणे, भगवान गवस, कृष्णा पर्येकर, नगरसेवक दिवाकर गवस व संतोष म्हांवळणकर, बबलू पांगम, प्रवीण गवस उपस्थित होते.