कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन, शिवसेनेचा इशारा
By सुधीर राणे | Published: September 7, 2022 12:58 PM2022-09-07T12:58:33+5:302022-09-07T12:59:03+5:30
कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन असूनही केवळ तीनच वापरल्या जातात. रुग्णांना औषधे बाहेरून लिहून दिली जातात. स्वच्छतेबाबतही ...
कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन असूनही केवळ तीनच वापरल्या जातात. रुग्णांना औषधे बाहेरून लिहून दिली जातात. स्वच्छतेबाबतही तीच स्थिती आहे. उपलब्ध डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागासह अत्यावश्यक सेवा दिली पाहिजे. याबाबत सुधारणा करून रुग्णांना चांगली सेवा द्या. आठवडाभरात सेवेत सुधारणा न दिसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिष्टमंडळाने दिला.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुविधांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत डॉ. चौगुले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजू राठोड, कलमठ उपसरपंच वेदेही गुडेकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, संजना साटम, तेजस राणे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन आहेत. मात्र तीनच चालू आहेत. सोमवारी डायलेसीस होत नाही. त्यामुळे रुग्णांना त्रास होत असल्याकडे या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. यावेळी चौथी मशीन इर्मजन्सी काही समस्या आल्यास ठेवलेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तीही चालू करा, लोकांना सेवा द्या, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या समस्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आहेत. काही तज्ज्ञही आहेत. तर काही ऑन कॉल आहेत. मात्र, ओपीडी कमी झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता , ऑक्सिजन प्लांट उभारूनही अद्याप सुरू न झाल्याकडेही लक्ष वेधून चर्चा करण्यात आली. आठवडाभरात रुग्णालयांच्या सुविधांमध्ये, रुग्णसेवेत फरक न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला.