शिवकालीन देवभेट सोहळा भावपूर्ण वातावरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:49 PM2020-11-18T20:49:08+5:302020-11-18T20:52:07+5:30

malvan, shindhududurgnews, Religious programme मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा शिवकालीन देवभेट सोहळा सोमवारी अत्यंत साधेपणाने साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या सोहळ्याला अनेक अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. त्यामुळे या नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता म्हणून पालखीसोबत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच दरवर्षी साधारणतः रात्री १० वाजेपर्यंत बाजारात राहणारी पालखी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वीच बाजारपेठेतून मार्गस्थ झाल्याने बाजारातील गर्दी मंदावली. त्यामुळे यंदा आर्थिक उलाढाल कमी झाल्याचे चित्र दिसून आले. केवळ हॉटेल्स आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये थोडीफार गर्दी दिसून आली.

Shiva-era Devbhet ceremony in an emotional atmosphere | शिवकालीन देवभेट सोहळा भावपूर्ण वातावरणात

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा शिवकालीन देवभेट सोहळा सोमवारी अत्यंत साधेपणाने साजरा झाला.

Next
ठळक मुद्देशिवकालीन देवभेट सोहळा भावपूर्ण वातावरणात मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाची पालखी मिरवणूक

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा शिवकालीन देवभेट सोहळा सोमवारी अत्यंत साधेपणाने साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या सोहळ्याला अनेक अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. त्यामुळे या नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता म्हणून पालखीसोबत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच दरवर्षी साधारणतः रात्री १० वाजेपर्यंत बाजारात राहणारी पालखी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वीच बाजारपेठेतून मार्गस्थ झाल्याने बाजारातील गर्दी मंदावली. त्यामुळे यंदा आर्थिक उलाढाल कमी झाल्याचे चित्र दिसून आले. केवळ हॉटेल्स आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये थोडीफार गर्दी दिसून आली.


मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाची पालखी शहर परिक्रमेसाठी बाहेर पडते. ही पालखी आडवणमार्गे मोरयाचा धोंडा, दांडेश्वर मंदिर करून भाऊबीजेसाठी काळबादेवीच्या भेटीला आणली जाते. त्यानंतर बाजारपेठेतील रामेश्वर मांडावर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. जेवढा जास्त वेळ पालखी बाजारपेठेत राहील तेवढा जास्त वेळ बाजारपेठेत गर्दी होत असल्याने यानिमित्ताने बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक अटी शर्ती घालून या पालखी उत्सवाला परवानगी दिली होती. त्यामुळे रामेश्वर मंदिरापासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त पालखीसोबत ठेवण्यात आला होता. परिणामी भाविकांना दर्शन घेताना काही ठिकाणी गैरसोयदेखील झाली. त्यामुळे किरकोळ वादाचे प्रसंगही निर्माण झाले.

प्रशासन आणि भाविकांनी पालखीचे महत्त्व ओळखून सामंजस्याची भूमिका घेतली. पालखी सायंकाळी ५ वाजता रामेश्वर मांडावर दाखल झाली. इतर दिवशी ही पालखी साधारण सात ते आठ वाजता याठिकाणी येते. मात्र, यंदा पालखी लवकर आल्याने अनेकांना पालखी मांडावर आल्याचे समजलेदेखील नाही. या ठिकाणी केवळ अर्धा तास पालखी थांबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र व्यापारी संघ आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून किमान ७ वाजेपर्यंत ही पालखी रामेश्वर मांडावर ठेवण्यात यावी, अशी विनंती केली.

व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगरसेवक मंदार केणी यांसह पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने आणखी काही वेळ वाढवून दिला. मात्र सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी ही पालखी भरड नाक्यावरून देऊळवाड्याच्या दिशेने रवाना झाल्याने बाजारातील गर्दी ओसरलेली दिसून आली. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, उपनिरीक्षक नरळे आदींच्या नेतृत्वाखाली यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

Web Title: Shiva-era Devbhet ceremony in an emotional atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.