Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ, चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:43 PM2024-09-11T15:43:39+5:302024-09-11T15:44:02+5:30
मालवण (जि.सिंधुदुर्ग) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम ...
मालवण (जि.सिंधुदुर्ग) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आपटेची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही कडेकोट पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
चेतन पाटीलला पुन्हा पोलिस ताब्यात घेऊ शकतात
सरकारी अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी पोलिस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेऊ शकतात.